उल्हास मगरे तालुका प्रतिनिधी
तळोदा: सातपुड्यातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अक्कलकुवा तालुक्याच्या अतिदुर्गम परिसराच्या केंद्रस्थानी असलेल्या मोलगी गावात यूनिसेफतर्फे सुरु केलेले व आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या संलग्नीत पोषण पुनर्वसन केंद्र सध्यास्थितीत बंद अवस्थेत आहे. मोलगीचे पोषण पुनर्वसन केंद्र ग्रामीण व डोंगराळ परिसरातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सुरु करण्यात आले. या केंद्रातून नर्मदाकाठापासून धडगांव तालुक्याच्या सीमेपर्यंतच्या हजारो बालकांचे आरोग्य सुधारून त्यांना जीवनदान मिळाले आणि ते बालके आज वैकासिक जीवन जगत आहे. वजन कमी असलेल्या कुपोषित किंवा गंभीर असलेल्या बालकांना वेगवेगळ्या भागातून आशा वर्कर व आंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने या पोषण पुनर्वसन केंद्रापर्यंत पोहोचवले जाते. व येथून बालकांना पोषण आहार व औषधोपचार तसेच मातांना मार्गदर्शन केले जाते. मात्र हेच पोषण पुनर्वसन केंद्र गेल्या महीनाभरापासून बंद आहे. त्यामुळे अक्षरश: लाभार्थी बालकांना अतिदुर्गम भागातून नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयाचा एडमिट व्हावे लागत आहे. त्यातून काही पालकांना मार्गदर्शनाअभावी घरचा रस्ता बघावा लागत आहे. या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केल्यापासून ही गंभीर समस्या दिसून येत आहे. मोलगीचे केंद्र परिसरातील सर्व गावासाठी जीवनदायी असल्याने व ही गंभीर समस्या असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने सेवेतून कार्यमुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊन पोषण पुनर्वसन केंद्र पुन्हा सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थ व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीकडून होत आहे.