अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 20 ऑक्टोंबर :- घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलाव आणि कोपरी (कापसी) कोल्हापूरी बंधा-याला शासनाकडून अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने कोपरी (कापसी) येथील कोल्हापूरी बंधा-याचे काम दोन वर्षांपासून बंद पडले आहे.
घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलावाचे काम सुद्धा पावसामुळे जुन 2023 पासुन बंद पडले आहे. घाटंजी येथील मृद व जलसंधारण उपविभागात आर्णी, घाटंजी, केळापूर व कळंब तालुक्याचा समावेश असुन मृद व जलसंधारण उपविभागाच्या इतर तालुक्यात संबंधित उप अभियंताचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सायतखर्डा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
सायतखर्डा साठवण तलाव या प्रकल्पाला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने शासन निर्णयानुसार, शासन निर्णय ज. अ. प्र. – 1005/सुकाणू/प्र. क्र. 10/ जल – 1 दि. 13 जानेवारी 2009 अन्वये 6 कोटी 86 लाख 43 हजार 400 रुपये इतक्या किंमतीचे प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पाला C – बांधकामे व D – मुख्य विमोजकच्या रुपये 5 कोटी 69 लाख 99 हजार 1600 रुपये इतक्या किंमतीचे अंदाज पत्रकात तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. या कामाच्या ब – 1 निविदा काढुन कामाचे आदेश विभागीय कार्यालयाचे पत्र क्रमांक 3571 दि. 30 डिसेंबर 2014 अन्वये मे. बाजोरिया CONTRACTIONS कंपनी प्रा. ली. यवतमाळ यांना प्रदान करण्यात आली होती. तसेच ब – 1 करारनामा क्रमांक/15/2014-15 अन्वये दि. 1 जानेवारी 2015 रोजी घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलावाचे काम सुरू करण्यात आले. सन 2015 मध्ये स्ट्रीपिंग, जलरोधी खंदकाचे (COT) खोदकाम, DRAINING चे खोदकाम, गाभा भराव (HEARTING) व आवरण भराव (CASTING) इत्यादी कामें करण्यात आली.
त्यानंतर भुसंपादनाच्या रक्कमेचे शोधन न झाल्यामुळे तसेच धरणाची उंची 15.00 मिटर पेक्षा जास्त असल्यामुळे काटछेद मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक यांचे कडुन संकल्पित करुन घेणे करिता काम बंद पडले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये जलरोधी खंदकाचे (COT) भरावाचे काम करण्यात आले.
विशेष म्हणजे सायतखर्डा साठवण तलावाच्या धरणाची उंची 23.00 मिटर पेक्षा जास्त असल्याने धरणाचा काटछेद संकल्पनास मोक्यावरिल उपलब्ध साहित्याचा वापर करून करावयाच्या बांधकामास मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (CDO) नाशिक यांचे कडुन मंजुरी आवश्यक असल्याने सायतखर्डा साठवण तलावाचे काम कंत्राटदाराद्वारे बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, घाटंजी येथील मृद व जलसंधारण उपविभागाचे उप अभियंता राहुल मानकर यांचेशी संपर्क केला असता, अगोदर ऑफीसमध्ये जाउन माहिती काढून माहिती देतो, असे सांगितले. तदनंतर दोन वेळा भ्रमणध्वनी करुन संपर्क केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नसुन माहिती देण्यास जानुन बुजुन टाळाटाळ केली.
सायतखर्डा साठवण तलावाच्या कामावरील तसेच मृद व जलसंधारण उपविभागाचे कनिष्ठ अभियंता शाम बुटले यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सुद्धा भ्रमणध्वनी उचलला नसुन माहिती देण्यास टाळाटाळ केली.
यवतमाळ येथील मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एम. दमाहे यांचेशी संपर्क केला असता, मला सायतखर्डा व कोपरी (कापसी) कामाच्या बाबतीत काहीही माहिती नाही. मी घाटंजी येथील मृद व जलसंधारण उपविभागाचे उप विभागीय अभियंता राहुल मानकर यांना माहिती देण्यास सांगतो. तसेच मला खुप कामें असल्याने मला या बाबत काहीही माहित नाही. परंतु घाटंजी येथील मृद व जलसंधारण उपविभागाचे उप विभागीय अभियंता राहुल मानकर यांना माहिती देण्यास सांगतो, असे त्यांनी सांगितले.


