मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
स्वतःबरोबरच आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक कर्तव्य आहे.देशातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा उद्देशाने केंद्र शासनाच्या स्वच्छता हि सेवा अभियान २०२३ अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जंयतीच्या औचित्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री.मोहनलाल सोनी विद्यालय, नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि फातीमा बीबी उस्मान मुर्तुजा इंग्लिश मिडियम स्कूल या शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाने स्वच्छता अभियान राबविण्यात आलं.शालेय परिसराची स्वच्छता करण्याबरोबर विद्यार्थी व विद्यार्थींनींनी महात्मा गांधी,कस्तुरबा गांधी, सावित्रीबाई फुले,जिजामाता, लालबहादूर शास्त्री,पंडित नेहरु अशा थोर व्यक्तींच्या व्यक्तिरेखांसह गावामध्ये स्वच्छतेचा संदेश देत प्रभातफेरी काढण्यात आली. स्वच्छता हा शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते.स्वच्छतेने मन प्रसन्न रहाते.या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्याचे मोलाचे काम शाळा करते. समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे.यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी ‘आम्ही देशाचे भावी नागरिक घेऊ व्रत स्वच्छतेचे… रुप पालटू देशाचे…’ हे व्रत अखंड चालवू व देशाच्या विकासाला हातभार लावू.अशी प्रतिज्ञा करुन स्वच्छता हि सेवा अभियान यशस्वी केलं.


