मुंबई : भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३५४ हा लैंगिक शोषणाविरुद्धचा गुन्हा नाही. या कलमातंर्गत दाखल होणारा गुन्हा हा नैतिक वर्तनाशी आणि शारीरिक हल्ला या कृत्याशी संबंधित मानला जातो आणि तो महिलांनाही लागू होतो, असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महिला आरोपीला ‘आयपीसी’च्या कलम ३५४ अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. आरोपी महिलेला तीन मुले आहेत त्यातील एक दीड वर्षांचा आहे, ही बाब लक्षात घेवून तिला सहा हजार रुपये दंडासह एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी एका इमारतीमध्ये शेजारी राहणार्या दोन महिलांची वादावादी झाली. यावेळी आरोपीने पीडित महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला केला. इमारतीच्या आवारात तिचे कपडे फाडले. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली. मारहाण करुन कपडे फाडणार्या महिलेविरुद्ध आयपीसीच्या कलम ३२३ आणि ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील दाखल करण्यात आलेला गुन्हा निराधार आहे. महिलेला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हा आरोप करण्यात आला.पीडितेला दुखापत झाल्याचा वैद्यकीय प्रमाणपत्रही नाही. तसेच दोन्ही पक्ष महिला आहेत. त्यामुळे आरोपी महिलेविरुद्ध कलम 354 अंतर्गत दागल करण्यात आलेला गुन्हा शंकास्पद आहे, असा युक्तीवाद आरोप महिलेच्या वकिलांनी केला. या प्रकरणी सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये दोन शेजार्यांचाही समावेश होता. ते या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. यापैकी एकाने सांगितले की, पीडित महिलेला आरोपी महिलेने बुटाने मारहाण केली.सर्वांसमोर तिचा ड्रेसही फाडला.
या घटनेतील प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्त्वपूर्ण मानली गेली. या घटनेतील साक्षीदार इमारतीच्या एकाच मजल्यावर राहत आहेत. त्यांनी खोटी साक्ष देण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. बुटाने मारहाण झाल्यामुळे वैद्यकीय तपासणीत ही बाब निदर्शनास येवू शकत नाही, असे स्पष्ट करत महिलेला आयपीसी कलम ३२४ अंतर्गत दाखल झालेला गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवले. कलम ३५४ अंतर्गत दाखल झालेला गुन्हा लैंगिक शोषणाचा गुन्हा नाही. या कलमातंर्गत दाखल होणारा गुन्हा हा नैतिक वर्तनाशी आणि शारीरिक हल्ला कृत्याशी संबंधित मानला जातो आणि तो महिलांनाही लागू होतो. कारण महिला इतर कोणत्याही महिलेवर पुरुषाप्रमाणेच हल्ला करू शकते. त्यामुळे अशा घटनामध्ये स्त्री किंवा पुरुष असा भेद करता येत नाही. ‘आयपीसी’ कलम ३५४ अंतर्गत एखाद्या पुरुषा बरोबरच स्त्रीलाही कोणत्याही महिलेवर अत्याचार करणे किंवा महिलेची विनयभंग होईल, या गुन्ह्यासाठी दोषी धरले जाऊ शकते. एखाद्या महिलेच्या संमतीशिवाय किंवा तिच्या इच्छेविरुद्ध बळाचा वापर केल्यास संबंधित महिला गुन्हेगार ठरते, असे स्पष्ट करत महानगर दंडाधिकारी मनोज चव्हाण यांनी महिला आरोपीला आयपीएसच्या कलम ३२३ आणि ३५४ अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. तिला दीड वर्षांच्या मुलासह तीन मुले आहेत हे लक्षात घेऊन तिला सहा हजार रुपयांच्या दंडासह एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


