शिर्डी : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. सांगली तालुक्यातील गावांचा प्रश्न पाणी टंचाईचा होता,आता तेथील पाणी टंचाई दुर झाली आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या राज्यपालांची एकत्रितल बैठक झाली असून उभय राज्यांतील सीमावाद समोपचाराने सोडवू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ते माध्यमांशी शिर्डी येथे बोलत होते. सांगली जिल्ह्यातील काही गावे कर्नाटकाला जोडावे ही मागणी काही वर्षांपूर्वी झाली होती. त्याचा आधार घेत कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांनीही या मागणीवर जोर दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, साई बाबांकडे मागायचे काय? त्यांना सर्व माहित आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान लाभावे हेच महत्वाचे. कामाक्षी देवीच्या दर्शनाआधी साईबाबांनी बोलाविले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी 2012 मधील आहे. तेव्हा जतमध्ये पाणी टंचाई होती. आपण बऱ्याच योजना केल्या आहेत. योजना मार्गी लावतोय. पाण्यावाचून कुठलेही गाव इकडे – तिकडे जाणार नाही. ते कर्नाटकात जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे.
सीएम शिंदे म्हणाले, आमची बैठक काल परवाच झाली. जो सीमेचा जुना वाद आहे तो न्यायालयात आहे. हा विषय सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे. यात केंद्रही सकारात्मक भूमिका घेईल. याविषयी दोन राज्यपालांच्याही दोन बैठका झाल्या आहेत. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांना काही योजना मिळत होत्या त्यात आम्ही आणखी सुधारणा केल्या आहेत. त्या भागातील लोकांचा फायदा व्हावा ही आमची भूमिका आहे. सीएम शिंदे म्हणाले, कर्नाटकचे राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांची बैठकही झाली आहे. सीमावर्ती भागातील लोकांना आणखी काही लाभ देणार आहोत. कामाख्य देवीच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत यात काही दुमत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. यावर राज्यातील शिंदे सरकार गेले नाही तर महाराष्ट्राचे 5 तुकडे होतील, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील तालुक्यावर दावा करत आहेत. तरीही शिंदे सरकार गप्प आहे. हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका त्यांनी केली.