नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून त्याने आतापर्यंत जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला आहे. महाराष्ट्रातूनही २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून बाहेर पडण्याचा अंदाज असून तोपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. यंदा सरासरीइतका पाऊस पडला असून मान्सून परतीसाठी काही काळ रखडला होता. परंतु सध्या अनुकूल परिस्थिती असल्याने त्याचा प्रवास सुरू आहे. महाराष्ट्रात शुक्रवारपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. जळगाव, डहाणूपासून ही सुरुवात झाली असून आगामी सहा दिवस म्हणजे २० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. शनिवारपासून उत्तर महाराष्ट्रातून पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. मात्र, मुंबई, कोकण वगळता राज्यात दिवाळीदरम्यान पावसाच्या शेवटच्या आवर्तनातील मध्यम पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे, तर मुंबई आणि कोकणात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला सुरुवात होत आहे, त्या वेळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. शुक्रवारी रात्री औरंगाबाद, ठाणे, उस्मानाबाद, उदगीर, सांगली, परभणी, कोल्हापूर, महाबळेश्वर, कुलाबा, पुणे, रत्नागिरी, नांदेड या शहरांमध्ये जोरदार पाऊस पडला.