मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात ५ जुलै ते १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत किनारी स्वच्छता अभियान मोहीमे अंतर्गत “स्वच्छ सागर,सुरक्षित सागर” किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, मारळ, आरावी,दिवेआगर, वेळासआगर व श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या मोहीमेअंतर्गत श्रीवर्धन येथे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे,तहसीलदार सचिन गोसावी,नगरपरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या विभागाचे कर्मचारी यांनी आपला उस्फूर्त सहभाग नोंदवित समुद्रकिनाऱ्यावरील कचरा हटवण्याबरोबरच शहरामध्ये जनजागृती रॕली,प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप,श्रीवर्धन नगरपरीषदेच्या सेंद्रीय खत प्रकाल्पातील खतांचे वाटप, समुद्रकिनारी सुरुच्या वृक्षांची लागवड इ.पर्यावरण पुरक कार्यक्रम घेण्यात आले.
दिवेआगर समु़द्रकिनाऱ्यावर रायगड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी पंचायत समिती कर्मचारी व दिवेआगर ग्रामपंचायत सरपंच उदय बापट,ग्राम पं.सदस्य,ग्रामसेवक शंकर मयेकर व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने किनाऱ्याची स्वच्छता केली.तालुक्यातील हरेश्वर,मारळ,आरावी, वेळासआगर या किनाऱ्यांवरसुध्दा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दरवर्षी प्लॅस्टिक,काच,धातू,कचरा,कपडे इत्यादी विविध प्रकारचा हजारो टन कचरा समुद्रात पोहोचतो.पर्यटनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर किनारपट्ट्यांवर कचरा साचत आहे त्यामुळे सागरी विश्वाला या प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे.या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहीमेत विविध विभागाच्या शासकीय आधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच फ्लाईंग बर्ड असोशीएशन, सागर संरक्षण संस्था,श्रीवर्धन पर्यटन विकास संस्था,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या स्वयंसेवकांबरोबरच र.ना.राऊत व गोखले महाविद्यालय यांनीसुध्दा या “स्वच्छ सागर सुरक्षित सागर”अभियानात सहभाग घेउन हे अभियान यशस्वी केले.
हे अभियान ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे राबवले त्यातून जर त्या त्या भागातल्या स्थानिक ग्रामस्थांनी बोध घेऊन प्लास्टिकचा वापर टाळला तर हे अभियान खऱ्या अर्थाने फलद्रुप होईल. कारण प्लास्टिकचा अमर्याद वापर करुन ते सर्वत्र फेकून देणे आणि पुन्हा कोणीतरी असे अभियान राबवणार यापेक्षा प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळून अन्य कचऱ्याची विल्हेवाट “माझ्या कचरा माझी जबाबदारी” या तत्त्वावर स्वीकारुन हळूहळू आपण शून्य कचरा या संकल्पनेत पोहोचलो तरच या अभियानाचा हेतू साध्य होईल


