चार गाळ्यांना ठोकले सील
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२२:-भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून थकीत व चालू मालमत्ता कर, पाणी पट्टी कर तसेच नगर परिषदेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांचे भाडे वसुलीसाठी भद्रावती नगर परिषदेने दि.२२ मार्चपासून धडक मोहीम सुरु केली असून चार दुकान गाळ्यांना सील ठोकल्याने मालमत्ता धारकात खळबळ उडाली आहे.नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकाकडुन सक्तीने कर वसुली करण्याकरीता आज दि. २२ मार्च रोजी भद्रनाग मंदिर दुकान गाळयाचे थकीत असलेले भाडे व मालमत्ता कर वसुली करीता शुभम वासमवार, विठठल वासेकर, निळकंठ जेनेकर, गब्बर सिंग जुनी यांच्याकडे असलेल्या दुकान गाळयांना सील ठोकण्यात आले. तर गणेश मंदिर येथील दुकान गाळ्यांचे भाडे थकीत असलेल्या दुकान धारकांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. तसेच नगर परिषद क्षेत्रातील नागरीकांनी त्यांचेकडे असलेला थकीत रकमेबाबतची जप्ती टाळण्याकरीता मालमत्ता कर, पाणी पटटी कर व दुकान गाळे भाडे व मालमत्ता कर नगर पालिकेत जमा करण्याकरीता सुटटीच्या दिवशी कार्यालय सुरू असल्याबाबतच्या सुचना स्पिकरव्दारे कळविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कर भरुन नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले आहे.











