कोटापल्ली गावात आनंदाचे वातावरण.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/सिरोंचा-: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेले उप पोलिस स्टेशन रेगुंठा येथे दि.22 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतुन तसेच सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली पोलिस दादलोरा खिडकी या योजने अंतर्गत उप पोलिस स्टेशन रेगुंठा हद्दीतील मौजा कोटापल्ली व मोयाबिनपेठा या गावामध्ये पेट्रोलिंग दरम्यान ग्राम भेट देण्यात आले.त्या ग्राम भेटीदरम्यान सदर गावकऱ्यांनी रेगुंठाचे प्रभारी अधिकारी यांच्या समोर गावांचे अनेक समस्या मांडले.गावात पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात संपुर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य राहते.त्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यास अडचन निर्माण होते.त्यामुळे गावात सिमेंट रोडचे बांधकाम करून मिळण्याबाबत सदर गावकऱ्यांनी विनंती केली होती.सदर गंभीर समस्येची रेगुंठाचे प्रभारी अधिकारी विजय सानप यांनी त्वरित दखल घेत ग्राम भेटीमध्ये मांडलेल्या अडचणी बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे पत्रव्यवहार करून गावातील समस्यांची जाणीव करून दिली.सदर समस्यांच्या पत्रव्यवहाराची दखल घेत सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी नक्षल गाव बंदी योजना विशेष कृती कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समिती गडचिरोली यांनी नियोजनातुन 50 लाखाचे काम मंजूर केले आहे. त्यापैकी कोटापल्ली गाव येथे 50 मीटर अंतराचा सिमेंट काँक्रेट रोड तयार करून देण्यात आलेले आहे. सदर रोडचे काम पूर्णत्वास आल्याने सदरचा रोड वापरण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे.पोलीस विभागाच्या प्रयत्नाने कोटापल्ली गावात सिमेंट रोडचे निर्माण झाल्याने सदर गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.सदर रस्त्याच्या उदघाटना प्रसंगी रेगुंठा उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विजय सानप,पोलीस उपनिरिक्षक निजाम सय्यद, कोटापल्ली गावातील सरपंच,उपसरपंच, माजी सरपंच, इतर सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, मोयाबिनपेठा चे सरपंच व गावातील नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या वेळेस मोयाबीन पेठाचे सरपंच यांनी त्यांच्या गावातील चार सीसी रोड चे कामे नक्षल गाव बंदी योजना विशेष कृती कार्यक्रमांतर्गत काम मंजूर झालेले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे.रोड उद्घाटनाच्या वेळेस तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी रेगुंठा पोलिसांचे कौतुक केले.सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता जिल्हा पोलीस व सर्व पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.

