गांधीनगर : भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी रविवारी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ते आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भूपेंद्र पटेल गांधीनगरच्या राजभवनातच शपथ घेतील. तसेच मंत्रिमंडळाचे गठनही पुढील 1-2 दिवसात होईल.
गांधीनगरमध्ये होणार शपथ कार्यक्रम
भूपेंद्र पटेल यांच्या शपथ समारंभात केंद्रीयमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपचे अनेक वरिष्ठ नेते शपथ ग्रहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्री बनल्यानंतर भूपेंद्र यांनी काय म्हटले ?
भूपेंद्र पटेल यांनी म्हटले की, सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी गुजरातमधील विकासाचा रथ असाच पुढे नेत राहील. संघटनेला सोबत घेऊन पुढे चालायचे आहे.
5 वर्षानंतर पाटीदार समुदायाचे नेते मुख्यमंत्री
भाजपने 5 वर्षानंतर पाटीदार समुदायातील व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून दिला आहे. मोदी – शाह यांनी आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हे राजकीय पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
गुजरातमध्ये पाटीदार समुदायाचे प्राबल्य अधिक आहे. भाजपच्या दोन दशकांपासून जारी असलेल्या विजय अभियानामध्ये या समाजाचे मोठे योगदान आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पाटीदार समाजाच्या आनंदीबेन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. 2016 साली त्यांनी राजीनामा दिला होता. आता पुन्हा राज्यात पाटीदार समाजाच्या प्रतिनिधीकडे मुख्यमंत्री पद देऊन, पार्टी हायकमांडने पाटीदार कार्ड खेळल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.