विवरा : येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगासमोर मांडलेल्या धम्मतत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पवित्र ग्रंथाच्या वाचन कार्यक्रमाचा समारोप सोहळा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त बुद्ध विहार परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. विहारातील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर दीपप्रज्वलन व बुद्धवंदनेच्या पवित्र वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथातील विचारांचे महत्त्व विशद करत भगवान बुद्धांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता, करुणा, मैत्री आणि प्रज्ञेचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित वक्त्यांनी धम्मविचारांवर मार्गदर्शन केले, तर परिसरातील महिला, पुरुष, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक व वैचारिक उपक्रमात सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, महिला आणि बालकांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. बुद्ध विहार परिसरात करण्यात आलेली आकर्षक रोषणाई, सजावट आणि शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले धम्मअनुयायी यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाच्या वाचनातून तथागत बुद्धांचे विचार, त्यांची शिकवण आणि मानवतावादी दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या समारोप सोहळ्यातून देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे समाजात वैचारिक जागृती निर्माण होण्यासोबतच नव्या पिढीमध्ये बुद्धविचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीविषयी जाणीव निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.





