मुंबई, दि. ६ :- मुंबईतील वरळीच्या गजबजलेल्या सेंच्युरी बाजार सिग्नल जवळ उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर यावेळी त्यांच्यासमवेत होत्या.
स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या विकास निधीमधून या पोलीस चौकीचे काम केले जाणार आहे. हे काम दर्जेदार व्हावे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या चौकीचा उपयोग व्हावा, असे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. चव्हाण, उपायुक्त प्रणय अशोक आदी उपस्थित होते.
वरळी नाका वाहतूक चौकीचे उद्घाटन
नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने वरळी नाका परिसराचे सौंदर्यीकरण करून वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या वापरासाठी अधिक जागा उपलब्ध करून दिली जात आहे. याचाच भाग म्हणून तात्पुरत्या वाहतूक चौकीचे उद्घाटनही मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पोलीस सह आयुक्त वाहतूक यशस्वी यादव, अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.