त्रिफुल ढेवले
तालुका प्रतिनिधि मोर्शी
मोर्शी : गेल्या तीन दिवसापासून उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने नजिकच्या पाळा शेत शिवारातील सुमारे 6 हजार कोंबड्यांचा बळी गेला. हा मृत्यू नैसर्गिक आपत्ती असून त्या कोंबड्या उष्माघाताने मृत झाल्याच्या बाबीवर तज्ज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे.अचानक ओढवलेल्या या संकटामुळे कुक्कुटपालक रुपेश धनराज राणे व मोहन गुणवंत ठोके यांचे सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने त्यासाठी मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे. मृत कोंबड्यांमध्ये राणे यांच्या मालकीच्या 4 हजार कोंबडया असून ठोके यांच्या मालकीच्या दोन हजार कोंबड्या आहेत.सदर कोंबड्यांसाठी त्या-त्या ठिकाणी शेड असून ते थंड करण्यासाठी कुलरची व्यवस्थाही करण्यात करण्यात आली आहे. परंतु भारनियमन आणि मान्सूनपूर्व मेंटेनन्स तसेच इतर कारणांनी सतत वीज पुरवठा खंडित राहते. परिणामी कोंबड्यांना नियमितपणे पाणीही पुरविता आले नाही. अशाप्रकारे एकामागून एक आलेल्या संकटांमुळे सदर निष्पाप कोंबड्यांना आपला जीव गमावावा लागला. मोर्शी येथील पशुधन पर्यवेक्षक विजय निकम यांच्यामते कोंबड्यांचे शेड हे टिनपत्र्याचे आहे. त्यामुळे कोंबड्यांना उष्माघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.मोर्शीत उष्माघाताने कोंबड्या मृत झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामागे वीज पुरवठा खंडित असण्याचे कारणसुद्धा पुढे आले आहे. त्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. किती कोंबड्या मृत झाल्या, याबाबतचा सविस्तर अहवाल सोमवारी मागवतो. – डॉ. पुरुषोत्तम सोळंके, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. अमरावती असे नुकसान वारंवार होऊ नये म्हणून शासनाने सबसिडीवर सोलर पॅनलची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. ती मिळाल्यास नुकसान कमी होऊ शकते. यासोबतच यावर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यात यावी.


