पवन ठाकरे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर: संग्रामपूर स्थानिक प्रशासनाने तामगाव शहर व ग्रामीण भागात शासनाच्या परवानगीशिवाय बसविण्यात आलेल्या महापुरुषांच्या अवैध पुतळ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.तामगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी जाहीर आवाहन करत नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काही ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बेकायदेशीरपणे उभारण्यात आले असून याबाबत गुन्हे दाखल करून काही संशयितांना अटक करण्यात येणारच आहे.या कारवाईत भारतीय दंड संहितेच्या कलम 329(3) आणि महाराष्ट्र पुतळा पवित्रता भंग प्रतिबंध अधिनियम 1997 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.राज्य शासनाच्या 2017 च्या आदेशानुसार,कोणताही पुतळा उभारण्यापूर्वी जिल्हा पुतळा समितीची परवानगी आवश्यक आहे.मात्र परवानगीशिवाय पुतळे बसविण्याच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे.पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले की महापुरुषांचा अपमान होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव देऊ नये,असे आम्ही नागरिकांना विनंती करतो.स्थानिक प्रशासन व पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर पुतळे उभारू नयेत.तसे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


