पालकमंत्री मुनगंटीवार यांनीही घेतली दखल
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२०:-भद्रावती शहरात अलीकडे गांजा विक्रेते अतिशय सक्रिय झाले असून शहरातील अल्पवयीन तथा तरुण मुले-मुली गांजा सेवनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असल्यामुळे गांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे येथील भाजयुमो तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.गांजाच्या आहारी गेल्यामुळे या तरुणांचे व विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होत आहे.गांजामुळे अनेक तरुन गुन्हेगारीकडेही वळत असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन शहरात गांजाची तस्करी व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करून त्यांना शहरातुन हद्दपार करण्याची मागणी भद्रावती येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इमरान खान यांच्या नेतृत्वात भाजयुमोतर्फे पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्यि निवेदनातून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजयुमोतर्फे या संबंधात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते.याची दखल घेत मुनगंटीवार यांनी देखील पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून गांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे.