दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 01: मृग नक्षत्राच्या पूर्व संधेला पावसाची चाहूल लागली की पक्षी घरटे बांधण्यासाठी धावपळ करतांना दिसतात. पक्षांच्या किलबिलाटीवरून पारंपारिक अंदाजानुसार शेतकरी बांधवही पावसाचा अंदाज घेतांना दिसतो. कोणत्या प्रकारच्या झाडाच्या किती उंच्चीवर आणि कोणत्या प्रकारच्या डहाळीवर पक्षी घरटे बांधित आहे यावरून पावसाचे अनुमान काढला जातो. यात विशेषकरून कावळ्याचे घरटे केंद्रित असते. मात्र शेती पिकांवर वाढत्या विषारी औषद फवारणीमुळे कावळेच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने पावसाचे भाकीत काढायचे कसे असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षापासून नागरी जीवनात आणि शेती उत्पन्न वाढीसाठी विषारी औषधांचा अतिवापर सुरु आहे. विषारी द्रव्ये वापरल्यामुळे जे किटक , उंदीर, सरपटणारे प्राणी मूत्यू पडतात त्यांना कावळ्यांच्या खाण्यात आले की तेही मृत्यूमुखी पडतात अशी परिस्थिती आहे. तर जगले वाचलेले कावळे प्रजोत्पत्ती करू शकत नाहीत. यामुळे ग्रामीण भागात कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत चालली आहे. याकडे पर्यावरण प्रेमींनी दाखल घेण्याची गरज आहे. पक्षी गणांमध्ये कावळ्याला पूर्ण पक्षी म्हटले जाते. अनेक ऋतूंमध्ये तो माणसाबरोबर जगत असतो. देशात सामान्यपणे सर्वत्र आढळणाऱ्या कावळा या पक्षाची निवड पाऊस व हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी केली होती. कावळे आपली घरटे पावसाळ्यापूर्वी बांधतात. पाऊस येण्यापूर्वी त्यांचा घरटी बांधण्याचा आचरणावरुन पाऊस व हवामानाचा अंदाज बांधण्यात येतो. कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरुन वराहामिहिर, पराशर, गार्ग्य, नारद या विज्ञाननिष्ठ ऋषीमुनी पूर्वाचार्यांनी पावसाचा अंदाज दिलेला आहे. या संदर्भात त्यांनी कावळ्याच्या संबंधाने विविध घटकांचा विचार केला. आंबा, पिंपळ, निंब, करंज, अर्जून या झाडांच्या मध्यभागी घरटी केली तर चांगला पाऊस पडतो. तसेच पूर्व, उत्तर, ईशान्य, नैऋत्य, वायव्य या दिशांना झाडांवर घरटी केली तर पाऊस चांगला पडतो. जेव्हा कावळा उंच शेंड्याकडील फांदीवर घर बांधतो तेव्हा त्याला पाऊस कमी होणार याचा अंदाज आलेला असतो. कावळ्यांच्या घरट्यांची पडताळणी करण्यासाठी 1994च्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील पक्षी मित्रांच्या सहाय्याने निरिक्षण करण्यात आले होते. त्या तपासणीतील निष्कर्षावरून त्या वर्षी चांगला पाऊस पडला होता. लातूर, गडचिरोली या भागात कावळे दिसून येत नाही. त्यामुळे अजूनही नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. शेतकरी हवामान खात्याच्या भाकितावर आजही तेवढा विश्वास ठेवत नाही. तो आपल्या पारंपरिक कसोट्या, बदलती निसर्गचित्र यांचा अंदाज घेत असतो. यंदा मात्र पावसाचा अंदाज बांधण्याबाबत शेतकरी हतबल आहे. कावळे दिसून येत नसल्यामुळे त्याचे घरटे शोधायचे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

