पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड : कन्नड शहरातील पिशोर नाका परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आरोपीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने अटक केली. या आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तुल तिन जिवंत काडतुसे व एक मोबाईल असा 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुनील भाऊलाल मोरे वय 32 रा गराडा ता कन्नड असे आरोपीचे नाव आहे. तो शुक्रवारी सकाळी दहा वाजता कन्नड शहरातील चाळीसगाव रोडवरील पिशोर नाका परिसरात गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत मानकर याच्या कार्यालयातील सहाय्यक फौजदार उत्तम औटे यांना मिळाली. वरिष्ठ अधिकारी हेमंत मानकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य,पोलीस नाईक केसरसिंग राजपूत, जीवनसिह लोदवाल, राहुल लहाने याच्या पथकाने कन्नड शहरातील पिशोर नाका परिसरात सुनीलला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या वेळी पिशवीत गावठी पिस्तुल व इतर मुद्देमाल सापडला. सहाय्यक फौजदार उत्तम औटे यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके करत आहे.