शिवा मोहोड यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन
विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : राज्य शासनाच्या मातोश्री पांदन रस्ते योजनेतून अकोला जिल्हा वंचित राहिल्याप्रकरणी प्रशासनातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर प्रशासनाने योग्य कारवाईचे आश्वासन दिले.राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मातोश्री पांदन योजना लागू करण्यात आली. या योजनेमधून अकोला जिल्ह्याचे नाव सुटले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून राज्य सरकारला दोषी ठरविले जात आहे. परंतु या योजनेसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने प्रस्ताव पाठविला गेला नसल्याची माहिती प्राप्त झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी याबाबत रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.

या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शासनाकडे अकोला जिल्ह्याचा पांदन रस्त्यांचा प्रस्ताव गेला नाही त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवा मोहोड यांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निवेदन स्वीकारून याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकरराव वाघ यांच्यासह अमोल क्षीरसागर, ज्ञानेश्वर ताले, सुनील ठाकरे, राजेश बढे, अश्विन खडसे, हर्षल ठाकरे, अभिजीत खंडारे, अमोल निखाडे, सत्यम खारोडे यांच्यासह शेतकरी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.









