सात जागा राहणार रिक्त: एकाच ठिकाणी एकच उमेदवारी अर्ज
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमधील रिक्त १४ झालेल्या ग्रा.पं. सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार असून, तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. मात्र काही ठिकाणी पोटनिवडणुकीबाबत नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील भीली, बारुखेडा धोंडा आखर, हिंगणी खुर्द या पाच ग्रामपंचायतींमध्ये सात जागांसाठी उमेदवारी अर्जच दाखल न केल्याने सातही जागा रिक्त राहणार आहेत. त्यामध्ये सहा जागा या एसटी राखीव तर जागा सर्वसाधारण एक महिलांसाठी राखीव आहे. तालुक्यात १४ जागांपैकी सहा जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून, थंडीत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पिंपरखेड येथे एकच उमेदवारी अर्ज दाखल केला असून, जागा अविरोध होण्याची शक्यता आहे. चितलवाडी येथे एका जागेसाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच माळेगाव बाजार येथे एका जागेसाठी तीन अर्ज, गोर्धा येथील दोन जागेसाठी पाच अर्ज, तर शेरी बु. येथे एका जागेसाठी पाच अर्ज, थार येथील एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांनी दिली. काही उमेदवारांकडे जातवैधता प्रमाणपत्र किंवा प्रस्ताव सादर केल्याची पावती ६ डिसेंबर रोजी १२ वाजेपर्यंत सादर न केल्यास काही ठिकाणी अजूनही अविरोध निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही माहिती आहे.











