किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी तथा “पिकेल ते विकेल” या संत सावता माळी यांच्या नावाने सुरू केलेल्या बाजार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी आमदार तथा महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस प्रा. तुकाराम बिडकर यांनी शासकीय कामासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदनाद्वारे केली. प्रसंगी महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन “कृषी विषय” हा शालेय शिक्षण प्रणाली मध्ये समाविष्ट करण्याच्या घेतलेल्या “क्रांतिकारी व ऐतिहासिक” निर्णयाबद्दल तसेच पिकेल ते विकेल ह्या संत सावता माळी यांच्या नावाने सुरु केलेल्या बाजार योजनेबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष सदाशिव शेळके, महानगराध्यक्ष प्रा. श्रीराम पालकर, उपाध्यक्ष विजय उजवणे, प्राचार्य किशन मेहरे, जगतजीवन पल्हाडे, अशोक भराड, दिनकर धामणकर, राजदत्त मानकर आदींसह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.











