महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१०:-सोशल मिडियावर घातक शस्त्रे तसेच चिथावणीखोर आव्हानात्मक मजकुरांचा स्टेटस ठेवणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांवर प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांना एका पत्राद्वारे केली.वरोरा व भद्रावती शहरातील तरूण युवकांमध्ये सध्या विचित्र क्रेझ सुरू झालेली आहे. शहरात स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी फेसबुक, वॉट्सअॅप, इस्टाग्राम वर तलवारी, बंदुक, देशी कट्टा, चाकु, कोयता असे धारधार शस्त्र हातात घेवून स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी तरूण युवक सोशल मिडियावर धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा पोस्ट पाहून सामान्य माणसांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यतः महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. तरूण युवक हातात तलवार घेवून केक कापतांना फोटो सोशल मिडियावर टाकत आहेत. हा प्रकार अत्यंत भयावह असून यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाने दारूबंदी हटविल्याने तरूण युवक मद्यधुंद अवस्थेत नागरिकांना शिवीगाळ, धमक्या देणे व वाद घालण्याच्या प्रकारात वरोरा व भद्रावती शहरात वाढ झालेली आहे.अशा युवकांवर कारवाई करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशीही मागणी डाॅ.अंकुश आगलावे यांनी केली आहे.











