साहिल खान
तालुका प्रतिनिधी लोणार
लोणार : तालुक्यातील पांग्रा डोळे जिल्हा परिषद सर्कलमध्ये सततच्या व १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हिसकला गेला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयाची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गोदावरी भगवान कोकाटे आदींनी तहसीलदार यांनाएका निवेदनाव्दारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पांग्रा डोळे सर्कल मधील पांग्रा डोळे, टिटची, रायगाव, धाड, गोत्रा, गंधारी, सावरगाव मुंढे, देऊळगाव वायसा, शिवणी जाट, नांद्रा, मढी, पारडा दराडे, चिचोली सांगळे, येवती वझर आघाव आदी गावामध्ये १६ ऑक्टोबरला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, पिकांसह फळबागा, नेट शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजार रूपये आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी निवेदन देताना आदिवासी नेते सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान कोकाटे, सोपान आश्रू डोळे, अशोक पांडुरंग पुनवे, योगेश विनायक मुंढे, कैलास दिनकर उबाळे यांचे सह अनेकशेतकरी उपस्थित होते.