अकोला : महावितरणच्या अकोला मंडल कार्यालयाअंतर्गत बाळापूर शहर व उपविभागात अधिक वीज हानी असणाऱ्या भागात महावितरणने केलेल्या कारवाईत १५ जणांकडून १० लाख ६२ हजाराची वीज चोरी झाल्याचे उघड करण्यात आले आहे. बाळापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंतासह त्यांची संपूर्ण टिम तसेच भरारी पथकांकडून वीज चोरी मोहिमेला उपविभागात गती देण्यात आली आहे. शिवाय या मोहिमेत फॉल्टी मीटरचीही तपासणी करण्यात येत आहे.वीज मीटरमध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत कायद्यानुसार गुन्हा असून, या अंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. अकोला जिल्ह्यात महावितरण कंपनीने वीज चोरीविरूद्धची मोहिम अधिक तीव्र केली असून, दंडासह रक्कम न भरणाऱ्या वीज चोरांविरूध्द वीज कायदा २००३ कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विजेचा अनाधिकृत वापर कटाक्षाने टाळण्याचे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.


