मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कार्ला बु पं. स. तेल्हारा येथे कार्यरत शिक्षक संदीप विजय जाधव यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आॅनलाईन व आॅफलाईन अश्या पद्धतीने शैक्षणिक कार्य अविरतपणे त्यांनी सुरु ठेवले. कोरोना काळात आॅफ लाईन कृतिपत्रिका, स्वाध्याय कार्ड तयार करुन घरोघरी विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून सोडवून घेतल्या. 2018 मध्ये ते बोरव्हा याठिकाणी कार्यरत असतांना तेथील आदिवासी बहुल भागातील मुलांना आरोग्य विषयक चांगल्या सवयी, १००टक्के पटनोंदणी व उपस्थिती,वृक्षारोपन व संवर्धन,लोकसहभागातून शालेय मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सुंदर पोषकबाग फुलवली होती. त्याच पोषक बागेतील पालेभाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहार मध्ये ते करीत असत. त्यांचे आज पर्यंतचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय असेच राहिले आहे. आजही बोरव्हा शाळेचा हिरवळीचा परिसर त्यांच्या कार्याची ग्वाही देतो.संदीप जाधव यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत ११ सप्टेंबर रोजी आ. डॉ रणजीत पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.संदिप जाधव यांनी हा पुरस्कार विद्यार्थ्यांना समर्पित केला असून या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.