महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१४:-पत्नीशी झालेल्या भांडणात पत्नीच्या शरीरावर चाकुचे सपासप वार करुन तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवणा-या पतीस माजरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र रामप्यारे साहनी (४३) हा माजरी येथील खुल्या कोळसा खदानीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. तो वेकोलिच्या कुसना वसाहतीत ए-टाईप, ब्लॉक क्र.१० च्या ७७ क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये राहतो. दि.१३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याचे पत्नी सुमन (३६) सोबत काही कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात वीरेंद्र ने पत्नीच्या शरीरावर चाकुचे सपासप वार करुन तिचा जागीच मुडदा पाडला. हे भांडण सोडवायला गेलेल्या त्याच्या १७ वर्षीय सिमरन नामक मुलीलासुद्धा वीरेंद्रने चाकुने भोसकुन जखमी केले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. परंतु काही युवकांनी
पकडून त्यालापोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी मुलगी चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.दरम्यान, वीरेंद्रविरुद्ध माजरी पोलिसांनी भा.दं.वि.च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.त्याला दि.१४ जानेवारी रोजी भद्रावती येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी चैतन्य कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.