जि.प.शिक्षण विभाग व विश्वभारती विज्ञान केंद्राचा संयुक्त उपक्रम…
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर: जिल्ह्यातील शिक्षकांच्या व भूगोल अभ्यासकांच्या भौगोलिक व खगोलीय ज्ञानकक्षा समृद्ध करण्याच्या हेतूने व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सुवर्णमध्य साधन शिक्षण विभाग जिल्हा परिषद व विश्वभारती विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या संकल्पनेतून दिनांक 14 व 15 जानेवारी रोजी भूगोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये भूगोल व खगोलीय घटनांच्या एकूण 75 प्रतिकृतींचे प्रदर्शन विश्वभारती विज्ञान केंद्र अकोला वाशिम रोडवर भंडारज फाट्याजवळ केले आहे.
शालेय शिक्षण घेताना विद्यार्थी गणित इंग्रजी व विज्ञान विषयाकडे जास्त लक्ष देतो व भूगोला सारख्या कुतुहल निर्माण करणाऱ्या विषयाकडे दुर्लक्ष करतो परंतु इतर विषयासारखे भूगोल व खगोलशास्त्र सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.भूगोल विषय नेहमीच विद्यार्थ्यांना कल्पना विश्वात घेऊन शिक्षक शिकवीत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे विषयासंबंधीचे संबोध पक्के होत नाहीत पर्यायाने विद्यार्थ्यांना भूगोल विषय कंटाळवाणा वाटायला लागतो परंतु सर्व मुख्य विषया इतकेच भूगोलाला महत्त्व देण्यात यावे म्हणजे भूगोल विषयाच्या अभ्यासात मुलांना आवड निर्माण होईल यासाठी नवोपक्रमशील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि विश्वभारती विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल महोत्सवाचे आयोजन कोविड च्या सर्व नियमांची जाणीव ठेवून व जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत अगदी छोट्या प्रमाणात केले आहे या महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार आहे सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग ह्या राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर या असणार आहेत. या महोत्सवादरम्यान भौगोलिक व खगोलीय प्रतिकृतींची निरीक्षणे करण्यासाठी दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 पर्यंतचा वेळ निश्चित केला असून महोत्सवाला येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना संदर्भात व जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाने नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
सदर महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला चे अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून पातुर चे तहसीलदार दीपक बाजड,उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर, दत्ताभाऊ भारसाकळे, अभिजीत दोड राहणार आहेत.
भूगोल विषयातील अमूर्त संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी भूगोलाच्या प्रतिकृती अतिशय महत्त्वाच्या आहेत. भूगोला मधील अमूर्त गोष्टी प्रतिकृती रुपाने विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यास, निर्मिती केल्यास विद्यार्थ्यांचे संबोध स्पष्ट होतील. प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड वाढेल.
डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य.)
भूगोल महोत्सवाचे आयोजन खूप उत्साहाने करण्यात आले होते परंतु कोविड च्या तिसऱ्या लाटेमुळे सर्वांना महोत्सवाचा आनंद घेणे शक्य होणार नाही म्हणून कोविड चा प्रभाव कमी झाल्यावर आपण पुन्हा महोत्सव साजरा करणार आहोत त्यामुळे या भूगोल महोत्सव पाहण्यासाठी गर्दी करू नये.
प्रभाकर दोड
विश्व भारती विज्ञान केंद्र शिर्ला (अंधारे)