जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर : जगातील 210 राष्ट्रांमध्ये रोटरीद्वारे विविध सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत प्रत्येक वर्षी रोटरीचे अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी हे बदलले जातात आणि नूतन अध्यक्ष, सचिव व कार्यकारी संचालक मंडळाच्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करून जबाबदारीचे वाटप केले जाते. रोटरी वर्ष 2021-22 साठी रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही प्रा.डॉ.संजय गवई यांच्यावर तर सचिवपदाची जबाबदारी निळकंठ स्वामी यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंकूर हायटेक नर्सरी, लातूर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132चे माजी प्रांतपाल रो.डॉ.हरिप्रसाद सोमाणी हे होते तर विचारमंचावर रोटरी डिस्ट्रिक्ट 3132चे माजी प्रांतपाल तथा होरायझनचे सदस्य रो.डॉ.विजयभाऊ राठी, माजी अध्यक्ष.डॉ.मल्लिकार्जुन हुलसुरे, नूतन अध्यक्ष रो.डॉ.संजय गवई आणि नूतन सचिव रो.निळकंठ स्वामी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरीच्या प्रथेनुसार कॉल टू ऑर्डरने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमामध्ये सर्व प्रमुख अतिथींना भारतीय संविधान, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तत्वज्ञान, इतर विविध ग्रंथ व वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज म्हणाले की, महाराष्ट्र शासनाद्वारे विविध प्रकारच्या योजना आणि कार्यक्रमाची आखणी करून त्याची अंमलबजावणी केली जाते. या सर्व योजना आणि कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनने सक्रिय आणि सकारात्मक पद्धतीने सहकार्य करावे त्यामुळे लातूर जिल्ह्याचा विकास हा जलद गतीने घडून येण्यास मदत होईल. लातूर मधील सर्व नागरिकांमध्ये कठोर परिश्रम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी यशस्विता ही आपल्याला प्राप्त होईल असे सांगून त्यांनी नूतन अध्यक्ष रो.डॉ.संजय गवई व सचिव रो.निळकंठ स्वामी यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी प्रांतपाल रो.डॉ.हरिप्रसाद सोमाणी म्हणाले की, रोटरी ही सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी कार्य करते. रोटरीमध्ये प्रत्येक सदस्य हा आपले तन, मन, धन आणि श्रम देण्याचा प्रयत्न करतो. रोटरीद्वारे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. लातूर जिल्ह्याच्या विकासात रोटरीचे योगदान अनन्यसाधारण आहे असे सांगून त्यांनीही नूतन अध्यक्ष व सचिव यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लब लातूर होरायझनची ऐतिहासिक पार्श्वभूमी माजी प्रांतपाल रो.डॉ.विजयभाऊ राठी यांनी रोटरी फोरवे टेस्ट नूतन सदस्य प्राचार्य रो.डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी तर रोटरी वर्ष 2021- 21 या वर्षाच्या क्लब कार्याचा आढावा माजी अध्यक्ष रो.डॉ.मल्लिकार्जुन हुलसुरे यांनी सादर केला तर रोटरी वर्ष 2021- 22 मध्ये नियोजित कार्यक्रमाची माहिती नूतन अध्यक्ष रो.डॉ.संजय गवई यांनी सर्वांना दिली. या कार्यक्रमांमध्ये नुकताच लागलेल्या यूपीएससी निकालांमध्ये लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील माजी प्राचार्य तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश श्रीकांत गायकवाड यांचा 627 रॅंक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सहपरिवार यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच होरायझन क्लब मधील नूतन सदस्य आणि संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्ष आणि सदस्यत्व पत्र देऊन सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमामध्ये अंकुर हायटेक नर्सरी परिवारातर्फे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन सदस्य रो.प्रा.रंजीता श्रीराम वाघमारे यांनी केले तर आभार नूतन सचिव रो.निळकंठ स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब आफ लातूर सदस्यांच्या परिवाराची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनचे सर्व सदस्य आणि अंकुर हायटेक नर्सरीतील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.