जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर : लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ मी. मी. एवढी आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ८४.५ टक्के पाऊस पडल्याची नोंद दि. २२ ऑगस्टच्या तहसीलनिहाय पावसाच्या अहवालात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत जळकोट तालुक्यात सर्वाधिक ६४२.४ मी. मी. पाऊस पडला आहे. लातूर जिल्हा पावसाच्या बाबतीत तसा कमालीचा दुष्काळी भाग समजला जातो. दर दहा वर्षांनी लातूर जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ येतो. दुष्काळाचे हे चक्र गेल्या काही दशकांत सुरु झाले आहे. २०१६ मध्ये लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी भीषण कोरडा दुष्काळ अनुभवला आहे.
मिळेल तेथून पाणी आणुन पाणीपुरवठा करण्यात आला होता. खरे तर लातूर जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या आसपास मोठी नदी नाही. मांजरा, तेरणा या नद्याच लातूर जिल्ह्यासाठी जीवनवाहिन्या आहेत. मॉन्सूनमध्ये जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी एवढा पाऊस पडला तर लातूर जिल्ह्याला कधीच पाण्याची टंचाई भासणार नाही. मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, पाझर तलावांची संख्या ब-यापैकी आहे. पाणीसाठा मोठ्या प्रमाणात संचय करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतू, पाऊसच पडला नाही तर या सर्व व्यवस्थांचा उपयोग होत नाही आणि मग उजनीच्या पाण्यासह इतर पाणीपुरवठ्याच्या योजनांची जोरदार चर्चा होते.
लातूर जिल्ह्यात यंदाचा पावसाळा तसा लहरीच जास्त राहिला. अर्ध्याहून अधिक पावसाळा संपला असला तरी अद्यापकी मांजरा, निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह आठ मध्यम, १३२ लघू असे एकुण १४२ प्रकल्पांत आजघडीला पाणीसाठा जेमतेमच आहे. प्रकल्पांतील जलस्तर वाढण्यासाठी मोठ्या पावसांची नितांत आवश्यकता आहे. लातूर जिल्ह्यात यंदाच्या जूनपासून आजपर्यंत ५७४.१ मी. मी. पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या ८४.५ टक्के पाऊस पडला असून तालुकानिहाय पडलेल्या एकुण पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. लातूर तालुका ५०६.५ मी. मी., औसा-४८५.९, अहमदपूर-५७५.६, निलंगा-४४४.२, उदगीर-६२३.८, चाकुर-५३०.५, रेणापूर-५४६.७, देवणी-४२९.८, शिरुर अनंतपाळ- ४८२.४ व जळकोट तालुक्यात ६४२.४ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.२४ तासांत २५.३ मी. मी. पावसाची नोंद रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २५.३ मी. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. लातूर तालुक्यात ३४.२ मी. मी., औसा-२३.६, अहमदपूर-९.०, निलंगा-२२.३, उदगीर-२८.६, चाकुर-२४.२, रेणापूर-५०.४, देवणी-१४.८, शिरुर अनंतपाळ- ८.३ व जळकोट तालुक्यात २६.३ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात २५.३ मी. मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात रविवारीही पावसाची हजेरी
मोठ्या खंडानंतर लातूर जिल्ह्यात पाऊस परतला आहे. त्यामुळे कोमेजलेल्य पिकांना जीवदान मिळाले आहे. शेत-शिवारांनी पिके डोलू लागली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. शनिवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री ब-यापैकी पाऊस पडला. रविवारीही सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतक-यांची चिंता काहीअंशी कमी झाली आहे.