स्वातंत्र्यदिन पूर्वतयारीचा ‘आरडीसीं’कडून आढावा
कोरोना प्रतिबंधक नियम पाळून स्वातंत्र्यदिन होणार साजरा
सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी
– निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे
अमरावती, दि. 10 : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रविवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनीटे यावेळी आयोजिण्यात आला आहे. मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज येथे दिले.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृह क्र. 1 येथे बैठक निवासी उपजिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. महसूल, पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती कार्यालय आदी विविध कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. व्यवहारे म्हणाले की, मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करुन समारंभ होणार आहे. मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता करणे, रंगरंगोटी, कुंड्या ठेवणे, पताका लावणे, गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांना उभे राहण्यासाठी चौकट रंगविणे आदी कामे नियोजनबध्द पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. ध्वजवंदन समितीने ध्वज स्तंभ, राष्ट्रध्वज, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथकांची, बँड पथकाची नियुक्ती आदी कामे स्वातंत्र्यदिनाच्या आधीच पूर्ण करुन घ्यावी, अशा सूचना श्री. व्यवहारे यांनी बैठकीत दिल्या.
उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालयी अनुक्रमे प्रांत अधिकारी व तहसीलदार आणि ग्रामपंचायत मुख्यालय येथे सरपंच किंवा गाव प्रमुख हे ध्वजारोहण करतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम भौतिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश घेण्यात आले.