दिनानाथ पाटील
तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा: परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या विद्यार्थ्यांच्या पोलीसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी शहादा शहरातील व ग्रामीण भागातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून परभणी घटनेच्या व केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रपती व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना परभणी घटनेच्या दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्यामार्फत देण्यात आले. सदर निषेध मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून मनुस्मृतीचे दहन करून काढण्यात आला. यावेळी दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रपती व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तेथील आंबेडकरी जनतेने आंदोलन केले होते. पोलिसांनी खरे तर संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करायला हवी होती. ती न झाल्याने आंबेडकरी जनतेने शासनाला या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु या आंदोलनानंतर पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली आंबेडकरी वस्त्यांना टार्गेट केले. कोंबिंग ऑपरेशन करत घराघरात घुसून मारहाण केली गेली. निर्दयपणे पोलिसांनी तरुणांवर अमानुष बळाचा वापर केला. अनेक तरूणांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या, कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या विद्यार्थ्यांचा पोलीसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला आहे. संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाल्याबरोबर, शासनेने तत्परतेने त्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना तात्काळ अटक केली असती तर हे प्रकरणं एवढे चिघळलेच नसते. परंतु सदर गुन्हा हा देशद्रोहा सारखा गंभीर गुन्हा असताना देखील, गुन्हेगार व्यक्ती मनोरुग्ण असल्याच्या कारणा खाली ना शासनाने त्यांना अटक केली, ना त्यांच्यावर केस दाखल केली. शासनाची कृती एकीकडे संविधान प्रतिकृतीचा अपमान करणाऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देणारी आहे तर दुसरीकडे पोलिसांच्या अमानुष मारहाणीला बळी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या निरपराध विद्यार्थ्यावर अन्याय करणारी आहे. पोलिसी अत्याचाराचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा शहादा येथील पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते संयुक्तपणे जाहीर निषेध करत आहोत. आपण या घटनांची त्वरित दखल घेऊन सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा, त्याबरोबरच संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या गुन्ह्या संदर्भात तसेच सोमनाथ सुर्यवंशीला केलेल्या अमानुष मारहाणी संदर्भात निष्क्रिय आणि बेजबाबदार राहिलेल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना बडतर्फ करावे आणि परभणीच्या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून साकारलेल्या संविधानामुळे आज संपूर्ण जग भारत देशाला “लोकशाही देश” म्हणून ओळखते. या संविधाना प्रती आपली बांधिलकी लक्षात घेऊन आपण या घटनांची त्वरित दखल घ्याल आणि यंत्रणेतील दोषी लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलाल अशी आशा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर शहादा येथील विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते अनिल कुवर, शिवाजी घोडराज, रंजना कान्हेरे, वनिता पटले, बामिणी पिंपळे, दादाभाई पिंपळे, चुनीलाल ब्राह्मणे, सुनील शिरसाट, रघुनाथ बैसाणे, छोटू भाऊ कुवर, संदीप पानपाटील, जगन्नाथ ठाकरे, सुरेंद्र कुवर, कॉम्रेड सुनील गायकवाड, अनिल शिरसाठ, दिलीप पवार, दिलीप जगदेव, यादव कुवर, रवी मोरे, नामदेव पटले, सुभाष नाईक, रघुनाथ घोडराज, साहेबराव बिरारी, प्रकाश गुलाले आदि दलित बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.








