शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी : काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने आज परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून २५ इच्छुकांपैकी पाच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिंतूर विधानसभा मतदार संघातील दोन इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पाथरी तील पाच जणांपैकी ज्याला मनोज जरांगे पाटील उमेदवारी देतील, तोच अधिकृत उमेदवार असेल तर जिंतूर मधील दोन उमेदवारा पैकी एकाला उमेदवारी देतील अन्य इच्छुक आपली उमेदवारी मागे घेतील, असेही त्यांनी सांगितले.परभणी जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे चांगलेच प्रस्थ आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तरुणांवर चांगला प्रभाव आहे, त्यामुळेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट मराठवाड्या सह महाराष्ट्रात जाणवला. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अस्पष्ट भूमिका घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीमध्ये सरकारला हिसका दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी मागणी देखील तरुण मराठा समन्वयकांनी केली होती. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सध्या मी राजकीय आखाड्यात उतरणार नसून मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरावे, अशा सूचना केल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे पाथरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची काल बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये २५ इच्छुक उमेदवार समोर आले. पण सामूहिक निर्णय घेत पाच जणांचा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. आज पाथरी येथे भव्य अशी रॅली काढत मनोज जरांगे पाटील समर्थकांनी आपले पाच उमेदवारांचे अर्ज दाखल केले. यानंतर जरांगे पाटील ज्याची उमेदवारी अधिकृत करतील केवळ त्यांचाच उमेदवार अर्ज कायम ठेवला जाणार आहे. पाथरी विधान सभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. महा विकास आघाडी कडून पाथरीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यातच महाविकास आघाडी मध्ये आणि महायुती मध्ये बंडखोरी देखील झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महायुती मधील शिवसेनेचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष शहीद खान यांनी देखील बंड करत राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणुकी च्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण अशातच मनोज जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यां नी देखील चांगला जोर लावल्याचे दिसून येत आहे. तर जिंतूर मतदारसंघातील दोन इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीच्या विद्यमान आमदार सौ.मेघना दीदी साकोरे- बोर्डीकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडी तर्फे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अन्य इतर उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपआपले अर्ज दाखल केले आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या दोन समर्थकांनी अर्ज दाखल केले आहेत.एक उमेदवार जिंतूरचे गणेशभाऊ काजळे तर दुसरे सेलूतील असून प्रसाद महाराज काष्टे हे आहेत.मनोज जरांगे पाटील आत्ता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून एकदरीत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात काही शंका नाही.