डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
सेलू: कुठलाही पुरावा नसताना देशातील व राज्यातील महा पुरुषाबद्दल अपशब्द काढणे चुकीचे आहे. महापुरुषांचे विचार आपल्याला पटत नसतील तरीदेखील सामान्य माणसाने कोणत्याही महापुरुषाबद्दल चुकीचे बोलू नये ,असे परखड मत सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ते येथील श्री साई नाट्यगृह येथे वसंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित समग्र सावरकर ,या विषयावरील व्याख्यानात बुधवार ०९ ऑगस्ट रोजी बोलत होते. यावेळी वसंत प्रतिष्ठानचे महेश खारकर ,अॅड ऊमेश खारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना ते म्हणाले की, महापुरुषांचे विचार आपल्यासारख्या सामान्य माणसाला पटत नसतील तर, त्यासाठी सुसंस्कृत पद्धतीने विरोध झाला पाहिजे. कारण अत्यंत वाईट पद्धतीने बोलणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. सगळे महापुरुष एका कालखंडात होऊन गेले. सर्व महापुरुषांनी देशासाठी खूप काही कार्य केले. आम्ही सामान्य माणसं बोलत सुटलो हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही .त्यामुळे कोणत्याही महा पुरुषाबद्दल अपशब्द वापरून चुकीचे बोलल्यानंतर मला वेदना होत्यात, असे शरद पोंक्षे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सोशल मीडिया कुरण सद्य परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याची लायकी नाही अशी माणसे खोटे नाव वापरून घाणेरडे लिहीत आहेत व बोलत आहेत. याचे कारण सुसंस्कृत समाज गप्प बसलेला आहे .यामुळे लायकी नसलेल्या माणसांसाठी सोशल मीडिया कुरण झाले आहे. माफीनामा नव्हे दयेचा अर्ज राहुल गांधी यांनी सावरकरांनी माफीनामा लिहून दिला म्हणून वारंवार सावरकरांना टीकेचे लक्ष बनवले. मात्र कायद्याचे कसलेही ज्ञान नाही. त्यांनी सावरकर वाचलेले नाहीत .ब्रिटिशांच्या कायद्यांचा अभ्यास देखील केलेला नाही .म्हणून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप त्यांच्याकडून वारंवार केले जातात .हे स्पष्ट करताना ते म्हणाले की ,तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या काळात जे राजकीय कैदी कारावासात शिक्षा भोगत असताना
सदरील कैद्यांना सरकारकडे दयेचा अर्ज करण्याची ब्रिटिश कायदेमंडळामध्ये तरतूद होती .मात्र तत्कालीन बहुतांश कैद्यांकडे ब्रिटिश कायद्यांचा अभ्यास नसल्याकारणाने दयेचा अर्ज करण्याबद्दलचे अज्ञान होते. विनायक दामोदर सावरकर यांनी बॅरिस्टर पदवी संपादित केली होती. आणि ब्रिटिश कायदेमंडळाचा अभ्यास देखील केला होता .त्यामुळे त्यांना ही सर्व माहिती होती .त्या माहितीच्या आधारे त्यांनी, आपली राजकीय शिक्षा कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे स्वतः दयेचा अर्ज केला आणि येथील इतर राजकीय कैद्यांना देखील हा अर्ज करण्यासाठी आग्रह धरला. या पाठीमागचा त्यांचा हेतू असा होता की, आपली उपयोगिता ही केवळ, राष्ट्रासाठी उपयोगात आणली जावी. आपलं तारुण्य जर कारागृहात घालावे लागले तर, आपला देश स्वतंत्र कसा होईल ? स्वातंत्र्य लढ्यातील उर्वरित काम आपल्याला कसे करता येईल? त्यामुळे केवळ देश हीत व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन परिस्थितीत मुसद्यगिरीचा वापर करून, ब्रिटिश कायद्यातील तरतुदीनुसार आपली कारागृहातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अकरा वेळा सरकारकडे दयेचा अर्ज केला .याच दयेच्या अर्जाला राहुल गांधी माफीनामा म्हणतात हे पूर्णपणे अज्ञानी व चुकीचे आहे. सावरकरांनी अकरा वर्षे जे सोसलं ते आपण एक दिवस देखील सहन करू शकणार नाहीत त्यांच्या अंदमनातील कारागृहात त्यांना ब्रिटिश सरकारने दिलेला त्रास, त्यांची सात बाय अकराची अंधारी कोठडी. त्यांना आंघोळीसाठी तीन तांबे समुद्राचे खारे पाणी. उभे आडवे साखळदंड. एकाच जागेवर सगळी विधी व तेथेच निकृष्ट दर्जाचे भोजन. हे सगळं कल्पनेबाहेरच आहे .हे कोणीही सहन करणार नाही. मात्र सावरकर यांनी ते राष्ट्रासाठी व देशासाठी सहन केले. याची जाणीव त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना झाली पाहिजे. विनाकारण अपूर्ण ज्ञानात त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे यावेळी बोलताना शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केले. क्रांतिकारी बनवण्याची फॅक्टरी विनायक दामोदर सावरकर ही एक व्यक्ती नसून ,ही एक विचारधारा आहे. नव्हे ही एक क्रांतिकारी बनवण्याची फॅक्टरी आहे .हे सांगत असताना ते म्हणाले की, विनायक दामोदर सावरकर हयात असताना त्यांच्या सानिध्यात जे राजकीय कैदी आले, इतर व्यक्ती आले ,ते क्रांतिकारी व प्रखर राष्ट्रभक्तच तयार झाले . त्यांच्या सानिध्यात येणारा प्रत्येक जण देशासाठी समर्पित व्हायला तयार होतो. आजही त्यांचे विचार ऐकून राष्ट्रभक्त व देशभक्त तयार होतात. त्यांनी जे सहन केले कारागृहात असताना, त्यांना जो त्रास झाला ,त्यांना जे काम करावे लागले हे सगळे ब्रिटिश कायदे मंडळाच्या विरोधातील गोष्टी होत्या. मात्र त्यावेळी ब्रिटिशांनी सगळे कायदे धाब्यावर बसवले. व सर्वच राजकीय कैद्यांना चुकीच्या शिक्षा देण्यात आल्या. सावरकरांनी 11 वेळेस दयेचा अर्ज देऊन देखील ब्रिटिश सरकारने त्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही कारण सावरकर ही व्यक्ती नसून, ही एक क्रांतिकारी बनवण्याची फॅक्टरी आहे .हे तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले होते. त्यामुळे ब्रिटिश शासनाने त्यांना सोडण्याचा विचार केला नाही .मात्र सावरकरांनी त्यावेळेस देखील मला जरी सोडले नाही ,तरी माझ्यासोबतच्या सर्व राजकीय कैद्यांना सोडा. त्यांना कारागृहात ठेवू नका. असा आग्रह धरला .जेणेकरून किमान हे कैदी तरी परत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन देशासाठी काम करतील .हीच अपेक्षा होती. त्यामुळे त्यांच्या दयेच्या अर्जाला माफीनामा म्हणून त्यांच्यावर टीका करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तत्कालीन परिस्थितीत ती एक राजकीय मुसद्देगिरी होती .प्रत्येक ठिकाणी ताठ मानेने वागणं यापेक्षा कुठे मागे सरकायचे व कुठे पुढे जायचे हे लक्षात घेऊन ,आपण राष्ट्राला जास्त उपयोगी कसे पडू आणि राष्ट्राला उपयोगी पडणाऱ्या मार्गावरून आपल्याला कसे जाता येईल ,या विचाराने सावरकरांनी तत्कालीन परिस्थितीत घेतलेले ते निर्णय होते.आणि ते पूर्णपणे योग्यच होते .असेही पोंक्षे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
केवळ 60 रुपये भत्ता दिला. तत्कालीन ब्रिटिश सरकारने राजकीय कैद्यांना त्यांचे घरदार व संपत्ती सर्व जप्त करून कारागृहात पाठवल्यानंतर, त्यांच्या उपजीविकेसाठी म्हणून सर्व राजकीय कैद्यांना त्यांच्या शिक्षेनुसार 120 ते 150 रुपये भत्ता मिळत असे. मात्र ब्रिटिश सरकारने सावरकर यांच्यासाठी भत्ता देताना देखील अन्याय केला. सावरकरांना केवळ 60 रुपये इतकाच भत्ता दिला. कठोर शिक्षा व नाममात्र भत्ता देताना दुसऱ्या बाजूने तत्कालीन राजकीय कैदी, मोहनदास करमचंद गांधी यांना आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले होते तेथे झोपण्यासाठी गाद्यांची व्यवस्था होती. तर महात्मा गांधी यांना सुत कातणे आवडत असल्याकारणाने ,सुत ठेवण्यात आले होते . दूध आवडत असल्याकारणाने शेळी ठेवण्यात आली होती .एवढेच नव्हे तर महात्मा गांधी राजकीय कैदी असताना ,त्यांना 150 रुपये भत्ता देण्यात येत होता. हा भेद तत्कालीन ब्रिटिश सरकार यांनी करून ,भारतातील सामान्य माणसाचा फायदा उठवण्यासाठी षडयंत्र रचले होते .यामुळे हातात कागद दाखवून हा सावरकरांचा माफीनामा आहे असे सांगून गैरसमज पसरवणे चुकीचे आहे. कारण सावरकर हे व्यक्ती नसून एक विचार होते. त्यामुळे सावरकर विचार, गांधी विचार ,हे कोणीही संपू शकत नाही .ही सगळी मंडळी खूप मोठी माणसे होती. महापुरुष महामानव आहेत. आपण सर्वसामान्य माणसांनी सर्वच महापुरुषाबद्दल चुकीचे बोलू नये. असे परखड मत शरद पोंक्षे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले की मी 2018 पर्यंत वीस वर्ष, मी नथुराम गोडसे बोलतोय ,या नाटकाचे अकराशे प्रयोग केले . 2019 ला कर्करोग झाल्यामुळे थांबलो होतो. मात्र यापुढे अजून पन्नास प्रयोग करणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात गंगाधर कान्हेकर व संच यांच्या स्वागत गीताने करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश खारकर यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले. तर अॅड उमेश खारकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.











