अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी २०० कोटींचा निधी सर्व विभागीय कार्यालयांना वळता करण्यात आला आहे. परंतु, सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे तीन महिन्यांपासून विद्यार्थी आर्थिक लाभापासून वंचित असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना ते पात्र असूनही, विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता देता यावा, यासाठी ही स्वाधार योजना राबविण्यात येते. इयत्ता ११ वी, १२ वी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाप्रमाणे भोजन, निवास, निर्वाह भत्ता देण्यासाठी ही योजना आहे; मात्र सर्व विभागीय कार्यालयात २०० कोटींचा निधी उपलब्ध असतानाही विद्यार्थी मात्र त्यापासून वंचित आहेत.हे विद्यार्थी दुर्बल आर्थिक घटकातील असूनही विद्यार्थ्यांना कर्ज काढून घरभाडे, शैक्षणिक साहित्य, खानावळ, पुस्तकांचा खर्च करावा लागत आहे. पालकांची परिस्थिती हलाखीची असल्याने हा खर्च विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. निधीचे वितरण झालेले नाही. त्यामुळे, प्रादेशिक उपायुक्त कार्यालय विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नसून, अधिकारी – कर्मचारी कोणत्या कामात व्यस्त आहेत, असा प्रश्न संतप्त वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव आणि मिडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने लाभ न मिळाल्यास विभागीय समाजकल्याण कार्यालयांना घेराव घालून ‘जवाब दो’ आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आघाडीने दिला आहे.
लाभार्थी वंचित
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थी तीन महिन्यांपूर्वी निधी मिळूनही वंचित आहेत. यामध्ये सन २०१८-१९ मध्ये २१,६५१ लाभार्थी, २०१९-२० मध्ये १७,१०० लाभार्थी, २०२०- २१ मध्ये १४,९०८ विद्यार्थ्यांची निवड स्वाधार योजनेसाठी झाली होती. तथापि चालू वर्षी अर्थात २०२१-२२ मधील १४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता अद्यापही देण्यात आलेला नाही. अनुसूचित जाती आणि बौध्द घटकातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्थानासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचे तीन तेरा वाजविले जात असल्याचे चिञ दिसत आहे.











