अकोला : महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ता. ८ मार्च रोजी संपत आहे. त्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया पार पडणे शक्य नाही. त्यातच प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबल्यामुळे निवडणूकही लांबणीवर पडणार आहे. परिणामी ता. ७ मार्चपर्यंत अकोला महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
अकोला महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ हा ता. ८ मार्चपर्यंत होता तर महानगरपालिकेची मुदत ता. २८ मार्चपर्यंत आहे. त्यापूर्वी निवडणूक होऊन नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे प्रशासकीय स्तरावर अनेक कामे प्रलंबित राहिली. त्यातच प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाने वेळेवर निर्णय घेतले तर सदस्य संख्याही वाढविण्यात आली.
बहुसदस्य प्रभाग रचनेत तीन सदस्यांचा एक प्रभाग ही रचना करण्यात आली तर अकोला महानगरपालिकेचा ८० सदस्यांची संख्या वाढून ९१ झाली. त्यामुळे प्रभाग रचनेचा आरखडा तीनवेळा बदलावा लागला. अखेर ता. १ फेब्रुवारीला प्रभाग रचना प्रसिद्ध झाली. त्यावर हरकची व सूचना मागविण्यात आल्या असून, ता. २६ फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर ता ४ मार्चला अंतिम प्रभाग रचना होईल. दुसरीकडे प्रभाग रचनेनुसार अस्तित्वात असलेल्या मतदार यादीचे विभाजनही सुरू आहे. ही प्रक्रियाही ता. २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. परिणामी मुदतीत निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने अखेर प्रशासक नियुक्त होणार हे आता निश्चित झाले आहे.