अकोला,दि.1 – कोव्हिड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता लक्षात घेवून तसेच पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोस 77 टक्के तर दोन्ही डोसचे 44 टक्केपेक्षा जास्त लसीकरण झाले असल्याने निर्बंधात शिथीलता देण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता दि. 9 जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या आदेशात अंशतः बदल करुन मंगळवार (दि.1) पासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
आदेश याप्रमाणे :
1. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, मनोरंजन उद्याने, संग्रहालये, किल्ले सामान्य लोकांसाठी व इतर टिकीट असलेली ठिकाणे, सफारी ऑनलाइन तिकिटासह नियमित वेळेनुसार खुली राहतील. सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. या बाबत संबंधीत अनुज्ञप्ती अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर आवश्यक ते निर्बंध लावण्यात यावे.
2. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे ज्यांचे तिकीट आहे ते नियमित वेळेनुसार खुले राहतील. सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. या बाबत संबंधीत अनुज्ञप्ती अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर आवश्यक ते निर्बंध लावण्यात यावे.
3. ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षममतेसह सुरु राहतील. दररोज रात्री 10 ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहतील. हेअर कटींग सलून मधील इतर उपक्रम असल्यास ते पूर्णतः बंद राहतील. कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील. काम करणाऱ्या व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक राहील.
4. अंत्यविधीकरीता उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा राहणार नाही. परंतू कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील.
5. व्यक्तींच्या हालचालीवर रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकिय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहील.









