महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.११:’ येथील लोकसेवा मंडळाद्वारे संचालित लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या रासेयो विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा अभ्यास तथा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय,मोरवा चे संचालक प्रा. दिलीप चौधरी हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे सचिव मनोहर पारधे,सहसचिव नामदेव कोल्हे, सदस्य गोपाल ठेंगणे ,अविनाश पांपट्टीवार, आशिष गुंडावर, प्रा.धनराज आस्वले ,मते, मारोतराव वासाडे, प्राचार्य बंडू दरेकर उपप्राचार्य आशालता सोनटक्के उपस्थित होते. सदर स्पर्धा परीक्षा अभ्यास व मार्गदर्शन केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना नियमितपणे तसेच नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे विभागवार गट तयार करण्यात येणार आहेत.
स्पर्धा परीक्षा संदर्भात विविधांगी माहिती प्रा.दिलीप चौधरी यांनी प्रोजेक्टर द्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे आवड निर्माण केली. सर्वसामान्य कुटुंबातील व तळागळातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा वेध घेऊन स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, प्रशासकीय संधी, अभ्यासक्रम, एमपीएससी, यूपीएससी, परीक्षांचे पेपर पॅटर्न, पूर्व -मुख्य परीक्षा व मुलाखत, परीक्षांची तयारी इत्यादी विषयांची सविस्तर माहिती अगदी सहज सोप्या पण प्रभावी शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली.स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहित करण्याचा लोकसेवा मंडळाचा मानस असल्याचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. सदर केंद्र लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे एक ॲसेट व्हावे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.आज स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विविध क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असतातच. त्याला केवळ योग्य दिशा देण्याची गरज असते. या परीक्षेची तयारी शालेय स्तरावरूनच केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. याच दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास व मार्गदर्शन हा उपक्रम लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय या सत्रापासून हाती घेत असल्याची माहिती प्रा .सचिन सरपटवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष आकोजवर, प्रास्ताविक सचिन सरपटवार तर आभार प्राचार्य बंडू दरेकर यांनी मानले .याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.