कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी, आकोट
आकोट : शिक्षण महर्षी डाॅ पंजाबराव देशमुख यांनी मानवतेच्या कल्याणार्थ श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली.संस्थेतून लाखो विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देश विकासात मौलिक भर घातली.भाऊसाहेबांचे कार्य प्रगती पथावर नेण्यासाठी विद्यमान कार्यकारी परिषदेने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली,संस्थेच्या या सर्वांगीण प्रगतीत आजीवन सभासदांचे मोठे योगदान आहे,असे मत संस्था कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी व्यक्त केले.
दिनांक ११सप्टेंबर २०२२ रोजी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक होत आहे.त्यानिमीत्ताने आजीवन सभासदांशी हितगुज साधण्यासाठी आकोट येथे प्रगती पॅनल द्वारा प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इंगोले यांनी सांगितले की,पंजाबराव देशमुख मेडिकल महाविद्यालयाला प्रथमच पाच वर्षाची मान्यता मिळाली.यापूर्वी दरवर्षी मान्यता घ्यावी लागत असे.प्रवेश संख्येत पन्नास इतकी वाढ झाली.दवाखान्यातील रुग्णांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यश आले.कोरोना काळात महाविद्यालयाने उल्लेखनीय कार्य केले.प्राणवायू केंद्राची स्थापना झाली.संस्थेला प्रथमच भारतातील चाळीस हजार महाविद्यालयातून पहिल्या दोनशे महाविद्यालयात मानांकन प्राप्त झाले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कार्य केल्याबद्दल संस्थेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.शासन स्तरावरील महापुरुषांच्या यादीत शिक्षण महर्षी डाॅ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती,पुण्यतिथीचा समावेश करण्यात आला.अकोला जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयात दोन कोटींचे बांधकाम पूर्ण केले.तेरा कोटींचे बांधकाम सुरू आहेत.पुढील कालावधीत देखील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून संस्थेची भरभराट करावयाची आहे,त्यासाठीच आम्ही आमच्या पॅनलला प्रगती हे नाव दिले आहे,असे भावपूर्ण हितगुज दिलीप इंगोले यांनी आजीवन सभासदांशी साधले.यावेळी संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनीही संवाद साधला.प्रास्ताविक उपाध्यक्ष अॅड गजानन पुंडकर यांनी केले. यावेळी विचारपीठावर उपाध्यक्ष डाॅ.रामचंद्र शेळके,उमेद्वार अॅड. जयवंत पाटील पुसदेकर,कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ,प्रा. केशवराव गावंडे, उमेद्वार सुरेशदादा खोटरे,सुभाष बनसोड यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला आजीवन सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.संचालन अनंत कुलट यांनी तर आभार सुरेश खोटरे यांनी मानले.