महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : कृषी संजिवनी मोहीम सप्ताह अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे किसान गोष्टी कार्यक्रम तालुक्यातील चंदनखेडा येथील कृषी मंडळ अधिकारी कार्यालयात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नयन जांभुळे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उपसंचालक आर. जे. मनोहरे, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव उपस्थित होते. यावेळी मनोहरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय गुंडावार व प्रयोगशील शेतकरी सुनील उमरे, दत्तू येरगुडे, बंडुजी ननावरे, मारोती गायकवाड, किशोर ठावरी, यांनी आपल्या शेती पध्दतीमध्ये वापरत असलेल्या तंत्रज्ञानाबाबत आपले अनुभव कथन केले. तसेच महानंदा ढोके व मनीषा ठावरी यांनी गटामार्फत चालू असलेल्या प्रक्रिया उद्योग बाबत माहिती दिली. याप्रसंगी शिंगाडा लागवड प्रक्षेत्रालाही भेट देण्यात आली.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खतांचा संतुलीत वापर, पिकाची खत मात्रा बनविणे, सूक्ष्म मूलद्रव्यांचे महत्व, रासायनिक खतांच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच दशपर्णीअर्क, जीवामृत, गांडूळखत, नाडेप याबाबत कृषी पर्यवेक्षक पी. एम. ठेंगणे, विजय कवाडे, एम. एन. ताजने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक तंत्र व्यवसायी सुधीर हिवसे यांनी केले.कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी मित्र, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गटातील पुरुष व महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व सदस्य, अंबुजा फाउंडेशन, उमेद, माविम, गटातील महिला व शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता पी. जी. कोमटी, यु. बी. झाडे, अनिल भोई, कपिल शंकपाळे, प्रदिप काळे व सर्व कृषि सहाय्यक यांनी सहकार्य केले.


