13 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत राहणार कुंभमेळा.
5 लाख भाविकांकरिता उपलब्ध होणार सोईसुविधा
सौ.निलिमा बंडमवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा : गडचिरोली जिल्हयात सिरोंचा येथे प्राणहिता नदीवर दर 12 वर्षांनी येणारा पुष्कर मेळावा 13 एप्रिल पासून 24 एप्रिल पर्यंत भरणार आहे.पुष्कर मेळाव्यात प्राणहिता नदीवर सिरोंच्या येथील नदी घाटावर तेलंगणा,छत्तीसगड सह महाराष्ट्रातील लाखो भाविक स्नान करण्यासाठी व जवळच असलेल्या कालेश्वरम येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात.12 वर्षानंतर भरणाऱ्या पुष्कर मेळाव्या बाबत जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू असून कोणत्याही अडचणी भाविकांना येऊ नये म्हणून गतीने कामे करण्यात येत आहेत. यावेळी विविध आवश्यक कामे करून जिल्हा प्रशासन येणाऱ्या भाविकांचे जिल्ह्यात स्वागत करीत आहे.मेळाव्याचे आयोजना करिता तीन महीने अाधी पासूनच येणाऱ्या भाविकांसाठी नदीघाटावरील जागा तयार करणे,स्वच्छतागृह तयार करणे , पाण्याची व्यवस्था,लाईटची व्यवस्था तसेच इतर आवश्यक नियोजनासाठी लागणारी मदत याबाबत तयारी करण्याच्या सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिले होते.तसेच तेलंगणा प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करण्यात आले.मंदिर व्यवस्थापकांशी संवाद साधून भाविकांचा येण्याजाण्याचा मार्ग निश्चित करणे याबाबतही नियोजन करण्यात आले.यापूर्वी सन 2010 मध्ये झालेल्या पुष्कर मेळाव्यात तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सिरोंचा येथे पुल नव्हता.आता येण्या जाण्यासाठी पुलाची व्यवस्था असल्याकारणाने सिरोंचाकडे जास्त भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.साधारण 5 लाख भाविकांच्या हिशोबाने सदर मेळाव्याचे आयोजन होवू शकते असा अंदाज व्यवस्थेसाठी गृहित धरण्यात आले आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्कर मेळाव्यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून 10 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले.त्यामूळे आवश्यक सुविधा निर्मितीसाठी त्या निधीची मदत झाली.जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील स्थानिक प्रशासना तसेच जिल्हा प्रशासना सह तयारी बाबत वेळोवेळी चर्चा केली. बैठका घेतल्या.जिल्ह्यात क वर्ग पर्यटन यादीत 6 ठिकाणांचा समावेश 18 जानेवारी 2022 रोजी करण्याच्या ठराव संमत करण्यात आले.यात पुष्कर महामेळा ज्या ठिकाणी भरतो तेथील प्राणहिता नदीवरील सिरोंचा घाट,नगरम घाट व टेकाडा घाट यांचा समावेश करण्यात आला आहे.यामूळे संबंधित ठिकाणी भविष्यात पर्यटन विषयक कामे करण्यात येणार आहेत.जिल्ह्याबाहेरील लोकांसाठी पर्यटन म्हणूनही गडचिरोली जिल्हा चांगला आहे.त्यामूळे पर्यटन क्षेत्रामध्ये असणाऱ्या स्थानिकांना त्याचा सरळ अर्थिक फायदा होईल.या पुष्करसाठी जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या पुढाकाराने 10 कोटी रूपयांची विविध कामे पुष्करसाठी मंजूर करून ती वेळेत पुर्ण करण्यात येत आहेत . याबाबत तेलंगणा राज्यातील विविध माध्यमांनीही सकारात्मक बातम्या देवून कामांचे कौतूक केले आहे.येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयीसुविधांची निर्मिती केली असुन सिरोंचा शहरालगत दोन ठिकाणी प्राणहिता नदीवर स्नान करण्यासाठी नदी घाट आहेत.एक विठ्ठलेश्वर मंदिराजवळ तर दुसरा नगरम जवळ . या दोन्ही ठिकाणी पुष्कर दरम्यान येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.यात विठ्ठलेश्वर मंदिराजवळील घाट,नगरम,पोलीस चौकी,कंट्रोल रूम तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सनियंत्रणासाठी बसविण्यात येत आहेत.पुष्कर बाबत सनियंत्रणासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसाठी पेंडाल व टेंट उभारण्यात येणार आहेत.तसेच सर्वच ठिकाणी दिशा दर्शक फलक लावण्यात येणार आहेत विविध सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकर व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.विशेष म्हणजे आपत्ती विभागाकडून स्नानावेळी बचाव पथके उभी केली जाणार आहेत.पोहणारे व प्रशिक्षित मनुष्यबळ अनुचित प्रकारांवर आळा घालणार आहेत.यावेळी विविध आपत्ती व्यवस्थापन वाहने तसेच इलेक्ट्रीक बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वागत कक्षाची उभारणी केली जात आहे . दोन्ही ठिकाणी शुद्ध पाणी व्यवस्था तसेच हातपंप,विंधन विहीरीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.विविध गर्दीच्या ठिकाणी एलएडी स्क्रीनवरती आवश्यक माहिती सतत भविकांना दिली जाणार आहे.शौचालय व्यवस्थेसह आंघोळीसाठी स्नानगृह तसेच कपडे बदलण्यासाठी रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.नदी घाटावर जाणारा रस्ता सीमेंटचा तयार करण्यात आला आहे.60 नग रस्त्यांवरील लाईट्ससह 5 हायमास्ट लाईट उभारण्यात आल्या आहेत . प्रशासनाच्या व आरोग्य सुविधांच्या कामासाठी विस टेंट लावण्यात येत आहेत.कोविडबाबत विविध मेडिकल साहित्यासह आवश्यक इतर उष्णतेबाबत औषध पुरवठा करण्यात आला आहे.स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ,कचरागाडीसह व्यवस्था करण्यात येणार आहे.याचबरोबर पुष्करबाबत प्रशासनाकडून प्रचार प्रसिद्धी करून पुष्करबाबत माहिती दिली जाणार आहे.पुष्करबाबत माहितीपटाची निर्मिती,बॅनर,होर्डीग्ज,वृत्तपत्र जाहीरात तसेच गडचिरोली लाईव्ह अॅपसह विविध सोशल मिडीयावरून माहिती दिली जाणार आहे.पुष्कर हा नद्यांच्या पूजेला समर्पित असा भारतीय सण आहे. भारतातील 12 प्रमुख पवित्र नद्यांच्या काठावर असलेल्या देवस्थानांमध्ये पूर्वजांची पूजा,आध्यात्मिक प्रवचन , भक्ती संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो.प्रत्येक नदीकाठी 12 वर्षांतून एकदा हा उत्सव साजरा करण्यात येतो.सिरोंचा हे ठिकाण उन्हाळ्यात काही प्रमाणात उष्ण असते.यावेळी पुष्कर कुंभमेळ्या दरम्यान 13 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान सर्वसाधारण 40 अंश डिग्री सेल्सियस ते 44 अंश डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक साहित्य येताना सोबत असणे भाविकांसाठी गरजेचे आहे.अशी माहीती गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी दिली आहे.