मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. सर्व विद्यार्थी चांगल्या मार्क्सने पास झाले. आता त्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे 11वी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे. या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. अखेर शिक्षण विभागाकडून अकरावी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी अकरावी सीईटीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ’21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजताच्या दरम्यान अकरावी सीईटीची परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. ही परीक्षा दोन तासांची असणार आहे. अकरावी सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 20 जुलै रोजी सकाळी 11:30 पासून ते 26 जुलैपर्यंत आपला अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
तसंच महत्वाचे म्हणजे, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी फी भरावी लागणार नाही. पण इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
10वी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार आहे. ही परीक्षा 100 गुणांची असणार असूस गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. ही परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर (OMR) पद्धतीने घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत त्यांना त्यांच्या गुणांकनानुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येणार आहे.