मतदान केंद्राला आले होते छावणीचे स्वरूप
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२५:-येथील विविध सहकारी संस्था मर्या.भद्रावती र.नं.८५७ च्या पार पडलेल्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि माजी पं.स.सदस्य नागो बहादे यांच्या नेतृत्वातील शेतकरी-शेतमजूर सहकार पॅनलचे सर्वच १३ उमेदवार निवडून आल्याने सहकार क्षेत्रात रवी शिंदे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे.या सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये शेतकरी-शेतमजूर सहकारी पॅनलचे विश्वास कोंगरे, अरूण घुगूल, रोहन कुटेमाटे, ज्ञानेश्वर डुकरे, सतीश वरखडे, अजित फाळके, नरेश काळे, प्रेमदास आस्वले, गोसाई नगराळे, रामचंद्र वांढरे, साहेबराव घोरुडे, सुषमाताई शिंदे, मनिषा सातपुते यांचा समावेश आहे. या संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक संपेपर्यंत भद्रावतीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. व्यवस्थापकाला मारहाण करण्यापासून तर चाकुचा धाक दाखवून निवडणुकीचे दस्तऐवज पळवून नेण्यांपर्यंत गुन्हेगारी घटना घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर दि.२२ मे रोजी येथील लोकमान्य विद्यालयात पार पडलेल्या निवडणुकीत प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मतदान केंद्राला छावणीचे स्वरूप आले होते. स्थानिक पोलिसासह दंगा नियंत्रण पथकाच्या दोन गाड्या, अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते. पत्रकारांनाही मतदान केंद्रावर येण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी आणि पोलिस यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून व शाळेची व्यवस्था पाहण्यासाठी आलेल्या विद्यालयाच्या अधिका-यांनासुद्धा पोलिसांनी अडविले होते. शहरातील धानोरकर कार्यालय आणि रवींद्र शिंदे यांचे निवासस्थान येथेही मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.भद्रावतीच्या इतिहासात प्रथमच एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीत एवढा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.











