बंधूप्रेमाची अशीही अनोखी भेट
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२०:-लग्नसमारंभात नेहमीच कानी पडणारी चित्रपटातील गाणी आणि डी.जे. चा कर्णकर्कश आवाज या गोष्टींना फाटा देत समाजजागृती करणारे गीत गाऊन आदर्श विवाह सोहळा तालुक्यातील चंदनखेडा येथे नुकताच पार पडला.चंदनखेडा येथील माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते यांचे बंधू गणेश ऊर्फ बिरसा यांचा विवाह सावली तालुक्यातील बोरमाळा येथील मनोहर चौधरी यांच्या पूजा नामक मुलीशी जुळला. आपल्या लहान भावाचा अनोखा व संस्मरणीय विवाह ठरावा अशी विठ्ठल हनवते यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मुलीकडील मंडळींना विवाह हा आदिवासी आणि साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव मुलींकडच्या मंडळींनी मान्य केला आणि १८ मे ही लग्नाची तारीख ठरली. गावातील माॅ. माणिकादेवी क्लब ग्राऊंडवर भव्य मंडप उभारण्यात आला. लग्नासाठी हनवते परिवाराकडून छापण्यात आलेली पत्रिका आगळीवेगळी होती. या पत्रिकेवर ‘शुभ विवाह’ ऐवजी ‘निक्को मळमिंग’ असे लिहिण्यात आले होते. तर मागच्या पृष्ठावर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि इतर थोर पुरुषांची छायाचित्रे छापण्यात आली होती. लग्नात श्रीमंतीचा बडेजाव,पैशाचा नाहक अपव्यय व थाटमाट नव्हता. नवरदेवाची वरातसुद्धा बैलबंडीवर काढण्यात आली. अक्षता न वापरता पाहुणे मंडळींकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला. या लग्नाला सात्विकता, आध्यात्मिकता व सामाजिक जाणिवेची सदभावनेची किनार होती.चंदनखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते, संत, महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि समाजपरिवर्तनाची जान असलेले तळमळीचे युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश ऊर्फ बिरसा हनवते यांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने, आदिवासी पद्धतीने व मुळनिवासी आदिवासी महासभेच्या विचार धारेप्रमाणे संपन्न झाला. लग्नासाठी कोणताही मुहूर्त पाहण्यात आला नाही. थोर पुरुषांच्या प्रतिमांना वंदन करुन त्यांनी मानवाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची आठवण करीत आदिवासी पाटा म्हणजेच आदिवासी गीतांच्या माध्यमातून सहजीवनाची सुरुवात केली. यावेळी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा सत्कार केला. बंधूप्रेमाची अनोखी भेट विठ्ठल हनवते यांनी आपल्या भावाला दिली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.