नवी दिल्ली : केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत राज्यसभेत निवेदन केले. सरकारने सांगितले की, सांस्कृतिक मंत्रालय या प्रकरणी विचार करत असून लवकरच याबाबत चांगला निर्णय घेतला जाईल.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, मराठी भाषेच्या प्रश्नावर सरकार तत्परतेने विचार करत आहे. भारतीय भाषा हा सरकारच्या प्राधान्याचा विषय आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की, सरकारने आतापर्यंत ६ भाषांना (तमिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया) अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार सांस्कृतिक मंत्रालय या प्रकरणावर निर्णय घेते. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रकरणाच्या दिरंगाईबाबत प्रश्न विचारला होता. मेघवाल यांनी पुढे माहिती दिली की, मंत्रालयाने या प्रकरणी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. यानंतर हे प्रकरण साहित्य अकादमीकडे गेले असून त्याचा चांगल्या पद्धतीने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत लवकरच चांगली बातमी समोर येईल. यासाठी मंत्रालयांमध्ये बोलणीही सुरू आहेत. कोणताही निर्णय झाल्यास सभागृहाला कळवले जाईल. त्याचवेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनीही आपल्या लेखी उत्तरात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. आणखी एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना मेघवाल म्हणाले की, भाषा तज्ज्ञ समिती मराठी भाषेच्या प्रश्नावर लक्ष घालत आहे. संपूर्ण देशाला मराठी भाषेचा आणि इतिहासाचा अभिमान आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. विलंबाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हे प्रकरण संस्कृती, गृह आणि शिक्षण या तीन मंत्रालयांसमोर आहे. यामुळे वेळ लागतो.











