किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला जिल्हा व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने नेहरू पार्क चौक अकोला येथे शुक्रवारी सकाळी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रंसगी महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर, माजी आमदार हरिदास भदे,प्रा.विजय उजवने, जिल्हा अध्यक्ष प्रा.सदाशिव शेळके, गजानन इंगळे, श्रीकृष्ण बोळे, अनिल शिंदे, उमेश मसने, संजय निलखन, पुरुषोत्तम कोठाळे, महीला जिल्हाध्यक्ष मायाताई ईरतकर, शारदा थोटे,स्नेहा राऊत,दिपमाला खाडे, सविता तुरके, कल्पना गवारगुरु, स्नेहलता नंदर्धने, जयश्री नवलकर, पुनम लांडे, सुषमा कावरे, रामदास खंडारे,दिनकर नागे, सुभाष वाईन्देशकर , अनिल मालगे, लक्ष्मण निखाडे, तुषार उजवने , गणेश गाडगे,प्रकाश पाटील, किशोर श्रीनाथ, अनिल शिंदे गणेश पळसोदकर, मो.शब्बीर मो. हमीद, अंकुश वानखडे, सांगर सौदळे, गजानन बारतासे,परशराम बंड, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही काळाने त्यांची सुटका देखील करण्यात आली.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याने समता परिषदेसह सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने आज राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करत राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. शुक्रवारी अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला. यावेळी ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी यासह विविध न्याय मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर म्हणाले की, ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवीत आहोत. आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. ओबीसींच्या मागण्याबाबत सुरु केलेली ही आमची रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरु राहील असे माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यानओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलकांकडून विविध घोषणा
यावेळी आंदोलकांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, जय ज्योती जय क्रांती, ओबीसीचे राजकीय आरक्षण, हा आमचा हक्क आहे. हक्काचे आरक्षण आमची चळवळ, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींच पक्के आहे, ओबीसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा, नही चलेगी नही चलेगी दादागिरी, नही चलेगी, ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तढा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा यासह विविध घोषणा यावेळी आंदोलकांच्या वतीने यावेळी देण्यात आल्या.