मोहन चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि: २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी परळी शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे तिसरे ‘नॅक’ मूल्यमापन संपन्न झाले. या तृतीय मूल्यमापनासाठी नॅक त्रिसदस्यीय समितीच्या तज्ञांनी२२ व २३ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयास भेट दिली. या समितीत डॉ. जितेनकुमार सोनी (माजी कुलगुरू सौराष्ट्र विद्यापीठ गुजरात) हे समितीच्या अध्यक्षस्थानी होते तर डॉ. वासंती ताटीमाकुला (योगी वेन्नाम्मा विद्यापीठ कडापा, आंध्रप्रदेश) व डॉ. पार्वती रुद्रप्पा (व्ही इ टी फर्स्ट ग्रेड कॉलेज बेंगलोर, कर्नाटक) यांनी सदस्या म्हणून काम पाहिले. त्यांच्या या दोन दिवसीय भेटीत त्यांच्याद्वारा महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी केली गेली.
त्यात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम, समाजोपयोगी घेतलेली भूमिका, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, कार्यालयीन कामकाज अशा विविध विभाग कार्याचे मूल्यमापन केले. त्यात प्रथम दिवशी महाविद्यालयात कार्यरत विविध शैक्षणिक विभागांना भेट देऊन त्यांच्या कार्याचा अहवाल तपासून त्या त्या विभागाच्या कार्याचे कौतुक करून भविष्यत उन्नतीसाठी काही उपयोगी सूचनाही दिल्या. महाविद्यालयातील विविध मंडळे भाषावाड्मय मंडळ, विज्ञान मंडळ, सामाजिक शास्त्रे मंडळ, विद्यार्थिनी कल्याण विभागासह महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विविध क्लब कार्याची ही त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. याबरोबरच महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थिनी मेळावा, पालक मेळावा घेऊन यात पालक व माजी विद्यार्थिनींशीही या कमिटीने संवाद साधला. तसेच सध्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींची त्यांनी विविध प्रश्नांनाच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे मनोगत ऐकून घेतले. प्रथम दिनी सायंकाळी पाच ते सात या कालावधी दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे विविध गुणदर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. त्यात अनेक कलावंत विद्यार्थिनींनी या समितीसमोर आपल्या विविध कलागुणांचे अविष्कारण करून दाखविले. या पुनर्मूल्यमापन प्रक्रियेसाठी महाविद्यालयाने नेमलेल्या समितीच्या प्राचार्य डॉ. विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखालील महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे समन्वयक म्हणून प्रा डॉ. शिवनारायण वाघमारे यांनी काम पाहिले. या मूल्यमापनकार्याच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.