महेंद्र गोदाम
ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर
अंबाजोगाई ,घाटनांदुर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी नुकताच आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे. भाजपा च्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असली तरी चार दशकांपासून मुंडे कुटुंब आणि भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठ राहणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील हिवरा खुर्द येथील हिंदुलाल काकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्या ३४ वर्षांपासून राज्यात आणि केंद्रात सत्ता कोणाचीही असो भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत पक्षवाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे सामान्य शेतकरी कुटुंबातील पक्षनिष्ठ असणारे हिंदुलाल काकडे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड व्हावी ही लोकभावना आहे. या लोकभावनेचा पक्षश्रेष्ठी विचार करतील का? हिंदुलाल काकडे यांनी ३४ वर्षे केलेल्या निःस्वार्थ आणि प्रामाणिक कार्याचा सन्माम पंकजा मुंडे आणि भारतीय जनता पार्टी कडून होईल का असा सवाल ही आता जनतेतून कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
हिंदूलाल काकडे यांचे पक्षासाठी योगदान
१९८४ मध्ये वयाच्या अगदी १६ व्या वर्षी स्व. गोपीनाथ मुंडे यांना प्रेरणास्थानी मानून संघ शाखेशी जोडले गेले.
१९९० स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय.
१९९२ ते २००२ हिवरा खुर्द गावचे सरपंच पदी विराजमान.
२००२ मध्ये आपेगाव पं स गणाचे सादस्य म्हणून पद भूषविले. याच काळात भाजपा विद्यार्थी आघाडी आणि युवा मोर्चा अंबाजोगाई तालूकाध्यक्ष म्हणून कार्यरत.
२००७ ते २०१२ या काळात भारतीय जनता पार्टीचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत.
२०१२ पासून आज तागायत भाजपा जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत.
२०१४-१५ मध्ये पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा माध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून निवड.
२०१६ मध्ये लोकसभा विस्तारक म्हणून कार्यरत.
२०१७ मध्ये अटल अभियान सहकार समितीवर बीड जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत.
गेल्या ३४ वर्षांपासून एकाच झेंड्याखाली मुंडे कुटुंबासोबत एकनिष्ठ राहून काम करणारे हिंदुलाल काकडे हे एकमेव व्यक्ती ठरतील. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू आणि त्यांच्या नंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून अंबाजोगाई तालुक्यात ओळख असणारे हिंदुलाल काकडे यांची भाजपा च्या बीड जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागेल का याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. १९९२ मध्ये हिंदुलाल काकडे आणि त्यांचे चांगले मित्र असलेले सुरेश धस यांनी एकाचवेळी सरपंच पद भूषविले त्यानंतर सुरेश धस हे चार वेळा आष्टी विधानसभा मतदार संघातून आमदार झाले मात्र निःस्वार्थपणे सर्वासामान्य जनतेत जाऊन भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवणाऱ्या एकनिष्ठ आणि सामान्य कार्यकर्त्याला
पंकजा मुंडे न्याय देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








