अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, डहाणू
पालघर जिल्ह्याचा विकास राजकारणाच्या कचाट्यात अडकल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. ठाणे जिल्ह्यापासून विभक्त होऊन स्वतंत्र जिल्हा म्हणून 2014 मध्ये अस्तित्वात आलेल्या पालघरच्या गावांमध्ये अपेक्षित प्रगती अजूनही झालेली नाही. रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणी आणि वीजपुरवठ्यातील अडचणी, अपुरी बस सेवा, तसेच आवश्यक सार्वजनिक सुविधा यांचा अभाव स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे.गावागावांतील राजकीय हितसंबंध आणि पक्षीय मतभेद यामुळे विकासाची कामे रखडत असल्याचा आरोप केला जातो. प्रत्येक राजकीय गट आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इतरांच्या प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करताना दिसतो, ज्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास थांबतो. विकासाच्या नावावर राजकारण केले जात असल्याने ठोस पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रलंबित राहिले आहे.यातून सुटकेचा मार्ग म्हणून, पालघर जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांनी राजकीय पक्ष, धर्म, आणि जात-पात विसरून सर्वांनी एकत्र येऊन विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. जर सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गावांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य झाले, तर पालघर जिल्ह्याचा विकास शक्य आहे. जिल्ह्याचा खरा प्रगती मार्ग म्हणजे एकजूट आणि विकासास प्राधान्य देणे.








