मुंबई, दि. 2 – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील चीतोडा गावातील अंबिका नगरातील रमेश हिवराळे या दलित तरुणावर जीवघेणा हल्ला सवर्ण समाजातील वाघ कुटुंबातील 10 जणांनी तलवार गुप्ती लाठी काठी घेऊन केला. हा हल्ला अत्यंत अमानुष हल्ला होता. या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फ़े तीव्र निषेध करीत आहोत. हा अमानुष हल्ला करणाऱ्या आरोपींची पाठराखण करण्याची कोणीही भूमिका घेणे अत्यंत निषेधार्ह आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष द्यावे. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिला आहे.
या हल्ल्यात रमेश हिवराळे गंभीर जखमी असून त्यांच्या बहिणी चे हाताची बोटे तुटली तर आईच्या हातावर तलवारीचा वार झाला आहे.
या प्रकरणी स्थानिक शिवसेना खासदार प्रताप जाधव तसेच बाजूच्या मतदारसंघातील बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी गावात भेट देऊन एकतर्फी चिथावणीखोर वक्तव्य केले असल्याची माहिती पुढे आली आहे.ऍट्रोसिटी गुन्हा मागे घेण्यासाठी पिडित दलितांवर रॉबरी चोरीचे खोटे गुन्हे दाखल करा काही जास्त झाले तर मी 10हजार जणांची फौंज घेऊन येतो; शस्त्र अस्त्र पुरवतो असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. हे लिकप्रतिनिधीला शोभणारे वक्तव्य नाही.या वक्तव्याचा रिपाइं तर्फे आम्ही तीव्र निषेध करतो.त्यांच्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी. अशी मागणी रिपाइंचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष नरहर गवई यांनी केली आहे. गावात दोन्ही समाजात शांतता ठेवण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
चितोडा दलित अत्याचार प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चितोरिया यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधून ना. रामदास आठवले यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. या प्रकरणी सर्व हल्लेखोरांवर कारवाई करावी कोणत्याही निरपराधावर गुन्हा दाखल करू नये याची काळजी घेण्याबाबत ना. रामदास आठवले यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना सूचना केली. तसेच गावात दोन्ही समाजात शांतता राखण्याबाबत सूचित केले.