महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.२९:-चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधी योजने अंतर्गत भद्रावती पंचायत समितीतील महिला बचत गटांना दरीपंजीचे नुकतेच वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जि.प.सदस्या अर्चना जिवतोडे, जि.प.सदस्य यशवंत वाघ, पं.स.सदस्य चिंतामण आत्राम, संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार, पं.स.चे कृषी अधिकारी सुशांत गाडेवार आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांनी दरीपंजीचा वापर महिला सभा व महिलांचे कार्यक्रम यासाठी करुन बचत गट सक्षम करावे असे आवाहन याप्रसंगी आपल्या मनोगतातून केले. यावेळी तालुक्यातील १०० महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते दरीपंजीचे वाटप करण्यात आले. तसेच वटपौर्णिमेचे औचित्य साधून पं.स. परिसरात महिलांच्या हस्ते वड, कडुनिंब आदी वृक्षांचे रोपटे लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी प्रणाली खोब्रागडे यांनी केले.तर विस्तार अधिकारी मनोहर कापकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, उमेद अधिकारी मडावी आणि पं.स.च्या कर्मचारी वृंदाने सहकार्य केले.