सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनिधी कासारखेड
मेहकर दि १७ मेहकर व लोणार येथील पोलिसांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकरच निधी मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.आज दि.१७ ला मुंबई येथे मेहकर मतदार संघातील मेहकर, लोणार, डोणगाव, जानेफळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकाम संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर ,जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत,माजी आमदार शशिकांत खेडेकर हजर होते. बैठकीत मंत्री महोदयांनी सांगितले की राज्यातून पोलीस कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामासाठी ३०० प्रस्ताव आले होते.पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावरील निवासस्थाने करिता निधी मंजुरात सुरू आहे. लवकरच पहिला टप्पा संपून दुसऱ्या टप्प्यात मेहकर व लोणार चा समावेश करण्यात आला आहे.यावेळी खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांनी मंत्र्यांना सांगितले की मेहकर हे आता नागपूर मुंबई महामार्गावरील मुख्य शहर आहे तर लोणार हे जागतिक कीर्तीच्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा दोन्ही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकर निधी मंजूर करण्यात यावा. यावर गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले की दुसऱ्या टप्प्यात मेहकर व लोणारचा समावेश असून लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील. तर तिसऱ्या टप्प्यात डोणगाव व जानेफळ येथे कर्मचारी निवासस्थाने होतील असे बैठकीत ठरल्याचे स्वीय सहाय्यक रूपेश गणात्रा यांनी कळवले आहे.